वनविभागाने एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरोपण करण्याची कार्यवाही तात्काळ करावी* *- पालकमंत्री अमित देशमुख*


 

*वनविभागाने एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा

वृक्षरोपण करण्याची कार्यवाही तात्काळ करावी*

                                                                                      *- पालकमंत्री अमित देशमुख*






 

*विमानतळाच्या संरक्षण भिंतीचे काम तीन महिन्यात पूर्ण करावे*

 

*विमानतळाच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा*

 

*एमआयडीसी मधील ओपन स्पेस जागेवर वृक्षरोपण करावे*

 

 

लातूर, दि.28(जिमाका):- वन विभागाने एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षरोपण करण्यासाठी आराखडा तयार करावा. कोणत्या आराखड्यानुसार तात्काळ वृक्षारोपणाची मोहीम हाती घ्यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

          शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित वन विभाग, विमानतळ प्राधिकरण व एमआयडीसीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी महेश कुमार नेमाडे वन विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री शिंदे आदी उपस्थित होते.

          पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा खूप मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. त्या जागेवर झाडे लावण्यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा. तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा ही वृक्ष लागवड करण्याबाबत एक सविस्तर आराखडा सादर करावा व त्यानुसार माहे जून 2021 पासून वृक्षलागवड करण्यात यावी. वृक्ष लागवड करण्यासाठी रोजगार हमी योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून घ्यावा असेही त्यांनी निर्देशित केले.

           विमानतळ ते लातूर शहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याबाबत वन विभागाने पाहणी करावी. या रस्त्याच्या दुतर्फा शासकीय जमिनीवर अतिक्रमणे आहेत ते अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत लातूर तहसीलदारांना सुचित करण्यात आलेले आहे. तरी विमानतळ प्राधिकरण व वनविभागाने वृक्ष लागवडीबाबत योग्य नियोजन करावे. अशाप्रकारे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केल्यास लातूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

           विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या जागेवर सुरू असलेले संरक्षित भिंतीचे( कंपाउंड वॉल) कामाचे सर्व अडथळे दूर करून या संरक्षित  भिंतीचे काम तीन महिन्यात पूर्ण करावे. तसेच या  भिंतीच्या जवळील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्नही तात्काळ मार्गी लावावा असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिली. तसेच एमआयडीसीमधील ओपन स्पेस महामंडळाने ताब्या्यात घेऊन त्या जागेवर महामंडळाने स्वतः किंवा एनजीओच्या मदतीने वृक्षरोपण करावे असेही त्यांनी सूचित केले.  

                 

 

                                                            ******

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या