*महाराष्ट्रातील काँग्रेसचा भविष्यातला चेहरा काळाच्या पडद्याआड...*
निशब्द....
आज महाराष्ट्राचा उगवता तारा हरवला. महाराष्ट्राने एक मौल्यवान रत्न गमावला. मराठवाड्याचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राने आपला एक भावी मुख्यमंत्री गमावला आहे. राजीव दादा सातव आज आपल्यात नाहीत हे वास्तव माझे मन स्वीकारायला तयारच नाही. अत्यंत प्रेमळ, निष्कलंक व्यक्तिमत्व. राजीव दादांचा आणि माझा परिचय सन २००७ सालचा. तेव्हा मी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस मधील जे आर व्ही जी टी आय इन्स्टिट्यूट ला ट्रॅव्हल अँड टुरिझम चे शिक्षण घेत होतो. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना मराठवाडा विभागाची एखादी गाडी जरी दिसली तरी आम्हाला खूप छान वाटायचं. २००७ साली राजीवदादा स्वतः फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या तरी कामाच्या निमित्ताने आलेले होते. त्यावेळी माझी आणि त्यांची ओळखही नव्हती. मी आणि माझे पुण्यातील मित्र फक्त आपल्या मराठवाड्यातली गाडी उभी आहे म्हणून त्या गाडी जवळ गेलो. तेव्हा तेथे उभे असलेले ड्रायव्हर त्यांना विचारलं की ही कोणाची गाडी आहे ? त्यांनी सांगितलं युवक काँग्रेसचे मोठे नेते राजीवजी सातव यांची ही गाडी आहे. मी तोपर्यंत त्यांचं फक्त नावच ऐकून होतो. परंतु आज प्रत्यक्ष भेट होईल या अपेक्षेने अर्धा तास त्या पांढऱ्या सफारी गाडी जवळ थांबून राहिलो. काही वेळाने राजीव दादा आणि त्यांचे सहकारी कॉलेज मधून गाडीच्या दिशेने आले व गाडी जवळ येताच त्यांच्या ड्रायव्हरने आमच्याकडे हात करून त्यांना सांगितलं की हे लातूरचे आहेत. आणि पुण्यामध्ये शिक्षण घेतात. दादांनी माझ्याजवळ येवून माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला माझं पूर्ण नाव विचारलं. मी त्यांना माझा पूर्ण परिचय दिला. माझ्यासोबतच्या मित्रांचाही त्यांनी परिचय करून घेतला. थोडावेळ चर्चाही झाली. तेव्हा दादांनी त्यांचा पर्सनल मोबाईल नंबर मला दिला. आणि सांगितलं की यापुढे पुण्यामध्ये काहीही अडचण आली तर प्रत्यक्ष मला कॉल करायचा. आणि माझा मोबाईल नंबर घेऊन त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये फीड करून घेतला. त्यावेळी झालेल्या मुलाखतीतून मला या नेत्याचं व्यक्तिमत्व समजले, किती मोठं नेतृत्व आणि किती हा साधेपणा. माझी ओळख ना पाळख पाच मिनिटांमध्ये त्यांनी मला त्यांचा पर्सनल मोबाईल नंबर दिला. आणि माझा मोबाईल नंबर फिड करून घेतला. त्याच वेळी मी समजलो होतो या नेतृत्वाचे गुण. या भेटीच्या नंतर राजीव दादा जेव्हा केव्हा पुण्याला यायचे तेव्हा हमखास मला कॉल करून बोलावून घ्यायचे. आणि संतोष काही अडचण तर नाही ना हा त्यांचा नेहमीचा शब्द असायचा. दादांनी तेव्हा मला एन एस यु आय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे पुण्यामध्ये काम करशील का ? असंही विचारलं होतं.. परंतु मी दादांना माझी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली आणि मी संघाचा प्रथम वर्ष शिक्षित संघ स्वयंसेवक असल्याचेही त्यांना सांगितले. यानंतरही त्यांनी मला वेगळ्या विचारधारेचा आहे म्हणून कधी दूर केले नाही. त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं, ज्या ही संघटनेचे आणि पक्षाचं काम करशील तेथे अगदी निष्ठेने आणि तत्वाने करायचं. खरंच दादा हे सर्व लिहीत असताना माझ्या अंगावर काटा येतो आहे. तुम्ही आज आमच्यात नाहीत हे मान्य करायला माझे मन तयारच होत नाही. परंतु नियतीच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही. नेहमी चांगलीच माणसे का दुरावली जातात हेच मला कळत नाही..
कदाचित हे अतिशयोक्ती वाटेल परंतु महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता काँग्रेसमधील कोणत्या युवा नेतृत्वा मध्ये होती, तर ती राजीव दादा सातव यांच्यामध्ये होती. दिल्लीचं नेतृत्वही त्यांच्या बाजूने होत. म्हणूनच वाटतं महाराष्ट्रातील काँग्रेसचा भविष्यातील चेहरा काळाच्या पडद्याआड गेला. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे मौल्यवान रत्न गमावल्यानंतर मराठवाड्याने आज आणखीन एक रत्न राजीव दादा सातव यांच्या रूपाने गमावले .
अत्यंत मितभाषी, उच्चशिक्षित, सुसंस्कृत असा हा नेता होता. २०१४ सालची मोदी लाटही या नेतृत्वाला पराभूत करू शकली नव्हती. खूप मोठा जनसंपर्क असलेला आणी कार्यकर्त्याला नावानिशी बोलणारा, एका भेटीतच ओळख ठेवणारा असा हा नेता. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारा परंतु मीच हे काम केले असं या नेतृत्वाने आज पर्यंत तरी कधीही म्हटलेले मी पाहिलं नाही.
अशा या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला अत्यंत दुःखद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली...
-- *संतोष व्यंकटराव पनाळे*
*८४२१३८०८८८*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.