औसा तालुक्यात मुस्लिम बांधवांनी केली रमजान ईद घरातच साजरी
औसा प्रतिनिधी:-मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद अत्यंत साधेपणाने घरातच साजरी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाउनमध्ये शासनाने जरी व्यावहारिक शिथिलता दिली असली तरी औसा शहरासह तालुक्यातील लामजना , तपसे चिंचोली , जावळी व परिसरातील बहुसंख्य हातावर पोट असलेले मुस्लिम बांधवांनी लॉकडाऊनच्या काळात कमाईचे साधन बंद असल्यामुळे नवीन कपडे, चप्पल/बूट वगैरे खरेदी न करता, ही रमजान ईद अत्यंत साधेपणाने घरातच साजरी केली.
तसेच लॉकडाऊनकाळात रमजान महिन्यात गरजूंना आणि गोरगरीबांना धनधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करून श्रीमंत मुस्लिम बांधवांनी सुद्धा ही रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शांततेने साजरी केली.
या दिवशी एकमेकांना अलिंगन देऊन व हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या जातात. परंतु सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे भेटीगाठी न घेता मोबाईलवर संपर्क करून तसेच व्हॉटसऍप व फेस बुक यासारख्या सोशल मिडिया द्वारे सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
रमजान ईदमध्ये 'शिरखुर्मा' हा एक अविभाज्य घटक आहे. त्याची चव काही औरच...!!! यातच 'शिरखुर्मा पार्टी' हा अनेकांचा आवडता विषय. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आप्त स्वकीय व मित्रमंडळींना शिरखुर्माचे निमंत्रण देता येत नसल्याची खंत अनेक मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.