*धरल तर चावतय, सोडल तर पळतय ! शासन अंगणवाडीची माहिती इंग्रजीत भरायला सांगतय !!*
*महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतच माहिती भरण्याची व्यवस्था करावी.*
- *लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे*
लातुर : दि.२ - अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या महिलांना एका शासन निर्णयाने जबरदस्त पेचात टाकले आहे. कोरोनाच्या भीती पेक्षा सुद्धा अंगणवाडीची मोबाईल ॲप द्वारे इंग्रजीत माहिती भरण्याची जास्त धास्ती या सर्व माता-भगिनींना पडलेली आहे. मागील काही वर्षापूर्वी अंगणवाडीच्या कामासाठी शासनाने प्रत्येक अंगणवाडीच्या कार्यकर्तीला मोबाईल देऊन अंगणवाडीची माहिती मोबाईलच्या माध्यमातून पाठवायचे निर्देश दिले होते. मात्र ही संपूर्ण माहिती मराठीत भरावयाची असल्यामुळे फारशी कुणाला अडचण पडली नाही. शासनाने दिलेले मोबाईल दर्जेदार थोडेच असणार ? कमी किमतीचे मोबाईल घेऊन जास्तीची किंमत दाखवली असणार यात शंकाच नाही. त्यामुळे दोन वर्ष कसे तरी हे मोबाईल चालले. मात्र आता हे मोबाईल अधून-मधून सारखेच बंद पडतात. नंतर सर्वर बंद आहे. वरती काम चालू आहे. असे बरेच दिवस चालले. आणि हळूहळू एक एक मोबाईल बंद पडू लागले. मग थोडे दिवस मोबाईलचे काम बंदच झाले. मोबाइल बंद पडल्यावर रजिस्टर करा. आणि त्यात माहिती भरा असा आदेश वरिष्ठांच्याकडून दिला गेला.
अंगणवाडीच्या स्टेशनरी साठी पूर्वी प्रति वर्षाला एक हजार रुपये मिळत असत. मागील दोन वर्षापासून आता दोन हजार रुपये मिळतात. अंगणवाडी साठी वर्षभराचे रेकॉर्ड तयार करण्यासाठी एकूण चौदा रजिस्टर लागतात. एका रजिस्टरची किंमत चारशे रुपये आहे.चौदा रजिस्टरची किंमत होते एकुण पाच हजार सहाशे रुपये. शासन देते वर्षभराच्या स्टेशनरी साठी केवळ दोन हजार रुपये. हे दोन हजार रुपये कसे पुरतील ?असा प्रश्न प्रशासन चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना कधी पडतो की नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे मग हा खर्च भागवायचा कसा ? असा सवाल शासनाला लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केला आहे. अनेक भागात अंगणवाडी साठी भाड्याने जागा घ्यावी लागते. आणि अंगणवाडीच्या भाड्यापोटी प्रतिमहा शासन केवळ ७५० रुपये देते. लातूर सारख्या शहरात साधी एक खोली जरी किरायाने घ्यायची असेल तर दोन हजार रुपये लागतात. नाविलाजाने अंगणवाडी सेविका जास्तीचे भाडे स्वतः देतात. धुणीभांडी करणारी महिला सुद्धा दर महिना किमान दहा ते पंधरा हजार रुपये कमवत आहेत. मात्र अंगणवाडी सेविकांना म्हणावे तसे मानधनही नाही. केवळ आठ हजार पाचशे रुपये मानधनावर त्या काम करत असून भविष्यात पेन्शन योजना लागू होईल या आशेवर अंगणवाडीच्या सेविका आहेत. मानधन कमी आणि काम मात्र डीएड बीएड शिकलेल्या लोकासारखं करून घेत आहेत. त्यामुळे अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांची भयानक दुर्दशा आहे. याचा गांभीर्याने शासनाने विचार केला पाहिजे असे व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. अंगणवाडीच्या महिला या आपल्या हातून लहान मुलांची सेवा होते असे स्वतःच्या मनाला समज घालून त्या काम करत आहेत.
खरंतर आज अंगणवाडीच्या सेविका फार अडचणीत आहेत. एक तर यातील बऱ्याच महिला दहावीपर्यंतच शिकलेल्या आहेत. काही महिला तर नववीपर्यंत शिकलेल्या आहेत. या महिलांना मोबाईल द्वारे अंगणवाडीची संपूर्ण माहिती इंग्रजीत भरणे कसे जमणार ? त्यामुळे आता नेमकं काय करायचं असा प्रश्न या अंगणवाडी सेविका यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय अशी बिकट अवस्था या अंगणवाडी सेविकेंंची झाली असल्याचे पनाळे यांनी म्हटले आहे. अंगणवाडीचा वयोगट ० ते ६ वर्षे असा आहे. या लेकरांना सांभाळण्यातच परेशान झालेल्या आणि इंग्रजी ज्ञान नसलेल्या या महिलांनी मोबाईल द्वारे अंगणवाडीची इंग्रजीत माहिती भरणे त्यांच्यासाठी अत्यंत जटील समस्या निर्माण झालेली आहे. वरिष्ठांचा तर तगादा सुरू झाला आहे, माहिती इंग्रजीत भरा. महिलानी अधिकाऱ्यांना साहेब हे आम्हाला जमत नाही असं सांगितलं तर, ते म्हणतात आमचा नाविलाज आहे. आम्हालाही वरून आदेश आहेत, आम्ही तरी काय करणार ? आत्ता नवीन भरती झालेल्या महिला मात्र त्यांचे शिक्षण बऱ्यापैकी झालेले आहे. त्यामुळे पंचवीस टक्के महिलांना इंग्रजीत अंगणवाडीची माहिती भरण्याची फारशी अडचण वाटत नाही. मात्र ७५ टक्के महिलांच्या समोर हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासनाने इंग्रजीतून माहिती भरण्याची अट रद्द करून अंगणवाडीची माहिती मराठीतच भरण्या संदर्भातला निर्णय करावा अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडे केली आहे. अनेक वर्षापासून या सेवेत असलेल्या महिलांना आज ना उद्या शासन आपला विचार करून चांगला पगार देईल आणि पेन्शन योजना लागू होईल या आशेवर त्या जगत आहेत. त्यात इंग्रजीतून माहिती भरण्याची अट घातल्यामुळे आता नोकरी सोडून काय करावं असा प्रश्न या अंगणवाडी भगिनींच्या समोर उभा आहे.
महाराष्ट्रा मध्ये इंग्रजी ॲप ऐवजी मराठी ॲपचा वापर करून अंगणवाडीची माहिती मराठीमध्ये भरण्याचाच निर्णय करण्याची आवश्यकता असल्याचे मत लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले आहे.
अंगणवाडी सेविकांच्या नावावर ज्या संघटना तयार झालेल्या आहेत त्या संघटना नेमकं काय काम करत आहेत. संघटनांनी आक्रमक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे पनाळे यांनी म्हटले आहे. तसेच आमदार खासदार असलेल्या लोकप्रतिनिधीनी अंगणवाडीच्या महिलांंच्या अडचणी समजून घेऊन हा प्रश्न मिटवला पाहिजे. आणि महाराष्ट्रात अंगणवाडीची सर्व माहिती मराठी भाषेतच देण्यात यावी अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.