पालक मंत्री ना. अमित विलासराव देशमुख
यांच्या सूचनेवरून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या
पथकाची बाभळगावला भेट
तिसरी लाट नव्हे : कुटुंबातील सदस्यांकडून लहान मुलाला
संसर्ग झाला असल्याचा पथकाचा निष्कर्ष
लातूर प्रतिनिधी : २२ मे :
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी बाभळगाव येथे भेट देऊन कोविड१९ प्रादुर्भावाच्या संदर्भाने पाहणी केली. गावात लहान मुलांना झालेली कोरोनाची लागण म्हणजे तिसरी लाट नसून तो कौटुंबिक संसर्ग असल्याचा निष्कर्ष या पथकाने काढला आहे.
बाभळगाव येथील ४ बालकांची कोविड-१९ तपासणी पॉझिटिव्ह आल्यामुळे हा संसर्ग म्हणजे तिसऱ्या लाटेचा परिणाम असल्याचे बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क करून गावात जाऊन तपासणी करावी व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन गावातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला ग्रामीण रुग्णालयात बाभळगाव येथील एकूण १५ रुग्ण दाखल आहेत. यात दोन कुटुंबातील एकूण १० रुग्ण असून, दोन्ही कुटुंबातील प्रत्येकी २ अशा एकूण ४ मुलांचाही त्यात समावेश आहे, सदरील मुले ६ ते १० वर्ष वयोगटातील आहेत. कुटुंबातील आईला कोरोनाची लागण झाल्याने त्या मुलांनाही तो संसर्ग झालेला आहे. त्या मुलांसह कुटुंबातील सदस्यांची प्रकृती चांगली आहे असे डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले. लहान मुलांना संसर्ग झाला आहे म्हणजे तिसरी लाट आली आहे असे म्हणता येणार नाही. कुटुंबातील सदस्यांकडून तो लहान मुलांना संसर्ग झालेला आहे, मुलांची व त्या कुटुंबातील सदस्यांचीही प्रकृतीही ठणठणीत आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे किंवा काळजी करण्याचे कारण नाही असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.