खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खते बियाणे पुरवठ्याचे नियोजन आवश्यक


  खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खते बियाणे पुरवठ्याचे नियोजन आवश्यक







 औसा प्रतिनिधी

 खरीप पेरणीसाठी पेरणीपूर्व मशागत करून शेतकऱ्यांनी आता काळ्याआईची ओटी भरण्याची तयारी केली आहे.औसा तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीन पिकाचा होणार असून यावर्षी पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेस खते व बियाण्याचा पुरवठा व्हावा असे नियोजन आवश्यक आहे. सोयाबीनने 7 हजार 500 रुपयांचा उच्चांक गाठला असून मोठ्या शेतकऱ्या व्यतिरिक्त कोणाकडेही घरगुती बियाणे उपलब्ध नाही. खाजगी कंपन्यांच्या 30 किलोच्या एका जागेसाठी 3300 रुपये मोजावे लागत आहे .महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने शेतकऱ्यासाठी दोन हजार दोनशे पन्नास रुपयांमध्ये महाबीज या 30 किलो बॅगेचा दर ठरवला असला तरी सर्व शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे घेता यावे यासाठी कृषी विभागाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे .सवलतीच्या दरात बियाणे खरेदी करता यावे म्हणून ऑनलाइन नोंदणी महाडीबीटी पोर्टल वर अनेकांनी केली असून लॉटरी पद्धतीने बियाणे मिळणार असल्याने सर्वांचे नंबर येणे कठीण आहे

 त्यासाठी तालुका कृषी कार्यालयाने तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना महामंडळाचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच महामंडळाच्या बियाण्याच्या वितरणासाठी व्यवस्थित नियोजन होणे आवश्यक आहे .कोरोना विषयीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाणे व रासायनिक मिश्र खते उपलब्ध होणे आवश्यक आहे .शहर व तालुक्यात बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता कृषी कार्यालयाने घेणे आवश्यक आहे .हवामान खात्याने मान्सूनचे आगमन वेळेवर होईल असा अंदाज वर्तवला आहे .मृग नक्षत्राच्या आगमनाला आता दहा दिवस बाकी असून मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वी गरजू शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध करुन कोरोना संकट काळात शेतकऱ्यांची गैरसोय दूर करणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या