परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी
अर्ज सादर करण्यासाठी 18 जूनपर्यंत मुदतवाढ
हिंगोली, (शेख इमामोद्दीन ) दि. 16 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी अर्ज सादर करण्यास दिनांक 18 जून, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण अर्ज swfs.applications.2122@gmail.com या ई-मेलवर पाठवून त्याची हार्डकॉपी विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर सादर करावा. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे , परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी , निर्वाह भत्ता , आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे . एकाच कुटूंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. वार्षिक उत्पन्न रु. 6 लाखापेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी संकेतस्तळास भेट द्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
*****
तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात
बायोमिक्स, ट्रायकोडर्मा व मेटारायझियम जैविक बुरशी उपलब्ध
हिंगोली, (जिमाका) दि. 16 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचेद्वारे निर्मित बायोमिक्स, ट्रायकोडर्मा आणि मेटारायझियम या जैविक साधनांची तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
बायोमिक्सचा वापर हळद, अद्रक, डाळिंब, मोसंबी, पपई, टरबूज, केळी आणि भाजीपाला पिकांसाठी करता येतो. बायोमिक्स मुळे पिकांची जोमदार वाढ होते आणि पिकांवर येणारे रोग व किडी यांचा बंदोबस्त चांगला करता येतो. बायोमिक्सचा वापर ड्रेंचिंग (आळवणीसाठी) तसेच फवारणीसाठी करता येतो. आळवणीसाठी बायोमिक्स प्रती 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम मिसळून आळवणी करावी. त्याचप्रमाणे फवारणीसाठी प्रती 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम वापर करावा. बायोमिक्स सोबत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते अथवा औषधे यांचा वापर करु नये. रासायनिक खते अथवा औषधे यांचा वापर 4-5 दिवसांनी आधी किंवा नंतर करावा.
मेटारायझियम अनायसोपली हे बुरशीजन्य कीडनाशक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे कीडनाशक पिकातील निरनिराळ्या मऊ कातडीच्या अळीवर परोपजीवी पद्धतीने वाढ होऊन तिचे अळीवर नियंत्रण करते. यामध्ये हुमणी, हिरवी बोंडअळी, शेंदरी बोंडअळी, पांढरी माशी आणि वाळवी यांचा समावेश आहे. मेटारायझियम अनायसोपली वापरण्याचे प्रमाण आळवणीसाठी 2.5 ते 3 किलो प्रती हेक्टर असावे.
ट्रायकोडर्मा हे बुरशी पिकास झिंक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य मिळवण्यासाठी मदत करते. पिकात जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता निर्माण करते. जमिनीद्वारे व बियाणेद्वारे प्रसारित होणाऱ्या निरनिराळ्या रोगकारक बुरशी व सूत्रकृमीवर परोपजीवी पद्धतीने वाढून त्याचे नियंत्रण करते. उदा. रायझोक्टोनिया, फ्युज्यारियम, पिथियम, स्कोलेरोशियम, व्हर्टीसेलियम इत्यादी.
शेतकरी बांधवांनी वरील जैविक साधनांचा वापर करुन विषमुक्त अन्न तयार करावे. तसेच आपला रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशक यांच्यावरील खर्च कमी करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे कीटकशास्त्र विभागाचे प्रा.अजयकुमार सुगावे आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.