नवीन सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी तज्ञ समितीचे प्राधान्याने गठन करा
■ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई दि. 30:
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2010 मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आणण्यात आले होते. आता जवळपास 11 वर्षानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नवीन धोरण आणण्यात येणार आहे. या नवीन धोरणाचे प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समितीचे प्राधान्याने गठन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज सांस्कृतिक कार्य विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सर्वसमावेशक असे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात येत आहे. तज्ञ समितीमार्फत अभ्यासपूर्ण, सर्वसमावेशक आणि कालानुरुप असे धोरणाचे प्रारुप तयार करण्यात येईल. याचशिवाय राज्यातील कलाकरांचे सर्वेक्षण संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्याच्या कामालाही गती देणे आवश्यक आहे.
सध्या राज्यावरील कोविडचे संकट अजूनही कमी झालेले नाही. परंतु येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण छोटेखानी कार्यक्रमातून करण्याचे नियोजनही करण्यात यावे असे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.