जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करावा -पालकमंत्री अमित देशमुख


 

जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर

  आराखडा सादर करावा     

                                                        -पालकमंत्री अमित देशमुख





लातूर, दि.16(जिमाका):- जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांची मागील पाच वर्षातील माहिती द्यावी. तसेच नियोजन विभागाने जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या योजनांचा सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

            शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अल्पसंख्याक योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सर्वश्री श्रीशैल्य उटगे , किरण जाधव, समद पटेल  नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी सुनील यादव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजन विभागाकडून अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे तरी या समाजातील नागरिकासाठी मागील पाच वर्षात जिल्ह्यात कशा पद्धतीने योजना राबविल्या गेले आहेत त्या बाबतचा सविस्तर अहवाल देण्यात यावा तसेच या समाजातील सर्व प्रतिनिधींना बोलावून त्याबाबतचे एक चर्चासत्र आयोजित करावे व त्या त्या चर्चासत्रातून या समाजाला आवश्यक असलेल्या बाबींची माहिती घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चा एक सविस्तर आराखडा पुढील पंधरा दिवसात सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले.

            अल्पसंख्याक समाजातील मुलांसाठी लातूर शहरातील  प्रस्तावित असलेल्या वस्तीगृहाचे काम  काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून उदगीर येथील आयटीआयच्या बांधकामाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळवून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

              प्रारंभी साहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्हा नियोजन विभागा कडून जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासाठी राज्य शासनाने ठरवून दिलेला 15 कलमी कार्यक्रम राबविला जात आहे. यामध्ये एकात्मिक बाल विकास, शालेय शिक्षण प्रवेश, उर्दू शिक्षण, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, शिष्यवृत्ती योजना, जातीय दंगलींना बळी पडलेल्या यांचे पुनर्वसन, गृहकर्ज उपलब्धता झोपडपट्टी पुनर्वसन, सेवा भरती प्रशिक्षण व तांत्रिक कौशल्यात दर्जा वाढ आदीचा समावेश असल्याचे सांगितले.

                ***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या