शेतकर्यांची खते बी-बियाणांसाठी होणारी आर्थिक लुट थांबवा
आ. संभाजी पाटील निलंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; आंदोलनाचा दिला इशारा
आ. संभाजी पाटील निलंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; आंदोलनाचा दिला इशारा
निलंगा/प्रतिनिधीः- यावर्षी मान्सून वेळेवर बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार शेतकर्यांनी खरीपाच्या पेरणीपुर्वी असलेली मशागतीची कामे उरकुन खते व बी-बियाणांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महाबीज सह अनेक कंपन्यांची खते व बी-बियाणांची टंचाई निर्माण झालेली असून उपलब्ध असणारी खते व बी-बियाणे चढ्या दराने विकली जात आहेत. यामुळे होणारी शेतकर्यांची आर्थिक लुट तात्काळ थांबविण्यासाठी मुबलक खते व बी-बियाणे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही मागणी तात्काळ पुर्ण न झाल्यास जिल्ह्यात भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आ. निलंगेकर यांनी दिला आहे.
जगाचा पोंशिंदा असलेला बळीराजा म्हणजे शेतकर्यांचे आम्ही किती कैवारी आहोत हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडून दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहेत. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्यांची मोठी परवड होत आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असून मान्सून वेळेवर बरसणार असा अंदाज सांगण्यात आलेला आहे. त्यानुसार शेतकर्यांनी पेरणीपुर्व मशागतीची कामे पुर्ण केलेली आहेत. त्यानंतर पेरणीसाठी आवश्यक असणारी खते व बी-बियाणे याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. मात्र राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे सध्या खते व बी-बियाणांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. विशेषतः महाबीज कंपनीची बियाणे व खते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची असताना सुद्धा त्या महामंडळांच्या बियाणे व खतासाठी शेतकर्यांना रात्र रात्र जागून काढून काढावे लागत आहेत. बाजारात उपलब्ध असणारी खते व बियाणे चढ्या दराने विक्री केली जात असल्याने शेतकर्यांची आर्थिक लुट सुद्धा होत असल्याची बाब या निवेदनाच्या माध्यमातून आ. निलंगेकर यांनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.
खरीपाच्या पेरणीपुर्वीच शासनाने खते व बियाणांसाठी आवश्यक असणारे सुक्ष्म नियोजन करून मुबलक साठा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र केवळ कागदी मेळ घालत शासनाने शेतकर्यांच्या उन्नतीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच शासनाने तात्काळ मुबलक प्रमाणात खते व बियाणांचा साठा उपलब्ध करून देत चढ्या दराने खते व बियाणे याची विक्री करणार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आ. निलंगेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. लवकरात लवकर ही मागणी पुर्ण न झाल्यास जिल्ह्यात भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आ. निलंगेकर यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर दगडू साळूंके, शाहुराज थेटे, शेषेराव ममाळे, मनोज कोळ्ळे, सुमित इनानी, युवराज पवार, सचिन गायकवाड, पाशामियाँ अत्तार, किशोर लंगोटे, तम्मा माडीबोने आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.