चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी प्रवेश, शिक्षण शुल्कासह देणगी वसुलीही मोठ्या प्रमाणात सुरू

 चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी प्रवेश, शिक्षण शुल्कासह देणगी वसुलीही मोठ्या प्रमाणात सुरू,,





प्रतिनिधी/उस्मानाबाद, अल्ताफ शेख।

                                     उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास सर्वच खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी प्रवेश, शिक्षण शुल्कासह देणगी वसुलीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र ‘शिक्षणाच्या नावाने ठणठण गोपाळ’ अशी दुर्दैवी स्थिती आहे. कोरोना प्रतिबंधामुळे शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बहुतांश शाळांमध्ये भौतिक सुविधा नाहीत. शाळांतील असुविधा आणि आर्थिक लूट याबाबत पालकांच्या तक्रारी येत नसल्याने शिक्षण विभागही त्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. 


जिल्ह्यात कोरोनामुळे मागील वर्षीपासून शैक्षणिक सत्र सुरू झालेले नाही. गतवर्षी अनेक दिवस शाळा बंदच होत्या. पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग जेमतेम महिना ते दोन महिन्यांसाठी सुरू झाले होते. असे असताना काही खासगी शाळा वारेमाप शुल्काची आकारणी करीत आहेत. जिल्ह्यात इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित सुमारे १४० शाळा आहेत. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, कोरोनाच्या संकटाने या मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.


राज्य सरकारचे निर्देश नसल्यामुळे शाळा अजूनही बंद आहेत. प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे, शुल्क आकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र शिक्षण देण्याचे पर्यायी मार्ग अवलंबले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढीस जाणार, असा सवाल पालकांतून विचारला जात आहे. कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे तात्पुरत्या नियुक्तीवर असलेल्या खासगी शाळेतील अनेक शिक्षक बेरोजगार झाले आहेत. जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीत, तोपर्यंत बिनपगारी घरीच थांबण्याच्या सूचना अनेक शाळांनी गुरुजींना दिल्या आहेत. त्यामुळे शाळेत जेमतेम शिक्षक आहेत. त्यावर मोजक्याच शाळांची ऑनलाइन क्लासची मदार सुरू आहे. तर काही शाळांनी आठवड्यातून एकदा हजर राहा, त्याप्रमाणे शिक्षकांना मानधन देण्याचे निश्चित केले आहे. दुसरीकडे पालकांकडून मात्र पूर्ण शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या लाटेने आर्थिक संकटात आलेल्या पालकवर्गाला शाळांच्या शुल्काचा जबर झटका बसत आहे. शाळा नसताना शुल्क भरण्यास सांगत असल्याने पालकवर्गही अवाक होत आहे. अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या