... अन् दीड वर्षाच्या चिमुकलीने केली मृत्युवर मात
लातूर : सध्या कोरोना महामारीने सर्वांनाच आपल्या विळख्यात घेतले आहे. याला लहान लेकरेही अपवाद नाहीत. त्यातच मेंदुची वाढ होत नसल्यामुळे अंगाची होणारी थरथरी, झटके व निमोनियाचा अॅटॅक आला. शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी - जास्त होत असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तसेच झटक्याचे प्रमाण वाढत गेले व बाळाला व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले. तब्बल चौदा दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या एका दीड वर्षाच्या चिमुकलीने दोन महिन्यांच्या रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर मृत्युवर मात केली असून तिला रुग्णालयातून सुटी देताना डॉक्टर, कर्मचारी आणि चिमुकली या सर्वांच्याच चेहर्यावरचा आनंद भारावून टाकणारा होता.
हैद्राबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील शंकरपल्ली येथील व्यवसायिक राजकुमार वैजनाथराव भिसे यांना मोठी पाच वर्षांची सृष्टी व दीड वर्षाची छोटी स्वरांजली अशा दोन मुली आहेत. मुलगी नको मुलगाच हवा, असा अट्टाहास करणार्या आजच्या युगात राजकुमार भिसे यांनी कधीही आपल्याला दोन्ही मुलीच आहेत म्हणून खंत व्यक्त केली नाही. उलट दोन मुलींचा पिता असल्याचा त्यांना गर्व आहे. अचानक छोटी मुलगी स्वरांजलीची प्रकृती बिघडल्याने राजकुमार यांनी तिला संगारेड्डी येथील डॉक्टरांकडे उपचार केला. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने भिसे परिवार मोठ्या चिंतेत होता. राजकुमार यांच्या उदगीर येथील मेव्हुण्यांनी स्वरांजलीला उपचारासाठी लातुरला आणावयास सांगितले. दि. २१ जानेवारी २०२१ रोजी लातुरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक आरदवाड यांच्या आरदवाड हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करून उपचार सुरु करण्यात आले. डॉ. आरदवाड यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. धर्मराज दुड्डे यांनी स्वरांजलीच्या सर्व चाचण्या केल्या व आजाराचे निदान झाले. त्यानंतर उपचाराला गती मिळाली. या काळात तिचे कुटुंबिय रुग्णालयाच्या बाहेर रात्र काढून ती बरी होण्यासाठी प्रार्थना करीत होते. सुरुवातीला स्वरांजली स्वत:चे हात - पायही हलवत नव्हती. तिच्या अंगात थरथरी होती, ती डोळेही उघडत नव्हती. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयातातील कर्मचार्यांकडून केलेले अथक प्रयत्न कामी आले. दोन महिन्यांच्या रुग्णालयातील व तीन महिन्यांच्या बाह्य उपचारानंतर आता स्वरांजली एकदम तंदुरुस्त झाली आहे. तिला रुग्णालयातून सुटी देताना सर्वांच्याच चेहर्यांवर एक विलक्षण आनंद दिसून येत होता. रुग्णालयातील डॉक्टरांकडून व कर्मचार्यांकडून बाळाला भेट वस्तू देऊन घरी पाठविण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.