बांधकाम कामगार,पथ विक्रेते व ऑटो चालकांना शासकीय अनुदानाचे वितरण
१०६०० व्यक्तींना १ कोटी ५९ लाख रुपयांचा लाभ
महापौरांनी मानले पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार
लातूर/प्रतिनिधी: राज्य शासनाने समाजातील विविध घटकांसाठी कोरोना संकटाच्या काळात अनुदान देण्याचे जाहीर केले होते. हे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. त्यामुळे लातूर शहरातील बांधकाम कामगार, पथ विक्रेते व ऑटोरिक्षा चालक अशा एकूण १० हजार ६०० व्यक्तींना प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी ५९ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य शासनाने निर्बंध लागू केले होते.या निर्बंधांच्या काळात समाजातील विविध घटकांची उपासमार होऊ नये, त्यांची रोजी रोटी बंद पडू नये यासाठी अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार त्या-त्या घटकांना अनुदान लवकर प्राप्त व्हावे यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे हे अनुदान प्राप्त झाले. बांधकाम कामगार,पथ विक्रेते व ऑटोरिक्षा चालकांना अनुदान वितरीतही करण्यात आले.
या योजनेअंतर्गत लातूर शहरातील ४३१६ बांधकाम कामगार, ४४९९ पथविक्रेते आणि १७८५ परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना प्रत्येकी १५०० रुपये अनुदान देण्यात आले. यामुळे लातूर शहरातील १० हजार ६०० व्यक्तींना एकूण १ कोटी ५९ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.
केलेल्या घोषणेची पूर्तता केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकरांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख आणि महाविकास आघाडी शासनाच्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.