लातुरात ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीयांची वज्रमुठ
राज्यातील सर्वात मोठा सर्वपक्षीय ओबीसी- व्हीजेएनटी आरक्षण बचाव जागर मेळावा लातुरात
मान्यवरांनी साधला ऑनलाईन संवाद
राज्यभर ओबीसी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
लातूर/प्रतिनिधी: ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातून विविध पक्ष व संघटनाच्या वतीने आंदोलने छेडली जात असताना या आंदोलनाला वेगळी दिशा देऊन मागणी संदर्भात जनजागृती व आंदोलनात सुसुत्रता आणण्यासाठी लातूर येथे ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याने आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल असा आशावाद उपस्थितीत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. राज्यपातळीवरील मान्यवरांनीही या मेळाव्यात मार्गदर्शन करून आपण आरक्षणाच्या मागणीसाठी कायम सोबत असल्याचे सांगितले.ओबीसी आरक्षण पुनर्स्थापीत करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी लातूरच्या भुमीतून वज्रमुठ आवळली. लातुरतील हा मेळावा ओबीसी आंदोलनास नवी दिशा देणारा ठरणार आहे. लातूर मधील जागर मेळावा हा ओबीसींचा राज्यातील सर्वात मोठा मेळावा ठरला असून यापुढे ओबीसींनी अधिक आक्रमक पवित्रा घेत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगीत केल्यानंतर ते पुनर्स्थापीत करावे या मागणीसाठी ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शनिवारी लातूर येथे आरक्षण बचाव जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ विधिज्ञ अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या मेळाव्यास राज्यपातळीवरील नेत्यांनीही संबोधीत केले. राज्याचे मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ऑनलाईन माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी आ. राजेश राठोड, माजी आ. रामराव वडकुते, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख, राज्यातील ओबीसी समंवयक बालाजी शिंदे, दादासाहेब मुंडे, नवनाथ पडळकर, सुशीलाताई मोराळे, मुख्य संयोजक ॲड गोपाळ बुरबुरे, रघुनाथ मदने, आयुब मणियार, प्रा. एकनाथ पाटील, सुरज राजे, अनिल पुरी, श्रीनिवास अकनगिरे, राजेश खटके, व्यंकट पन्हाळे, हरिभाऊ गायकवाड, नगरसेवक राजा मणियार, सौ सपना कीसवे, विजयकुमार साबदे, शरद पेठकर, चंद्रकांत मद्दे, मंजुषा कुटवाडे, गोविंद चोपणे, अनिल कुटवाडे, प्रा धनंजय बेडदे, विजयकुमार पिनाटे,धर्मवीर भारती, भाऊसाहेब शेंद्रे,ओमप्रकाश आर्य,राजपाल भंडे,जगन्नाथ गवळी,चंद्राकांत सुर्यवंशी ,कुमार श्रीमंगले, श्रीकांत मुद्दे, सुरज राजे, ताहेर सौदागर, नगरसेविका सपना किसवे, नामदेव ईगे, अविष्कार गोजमगुंडे, अजीज बागवान, अशोक मलवाडे, अजित निंबाळकर, दगडूसाहेब पडिले, रंगनाथ घोडके, राहुल जाधवर, राजेश गुंठे, राम गोरड, प्रदीपसिंह गंगणे, विशाल चामे, विजय टाकेकर, अनंत चौधरी संजय शिरसागर, प्रमोद पांचाळ, इस्माईल फुलारी, शिवाजी पन्हाळे, चेतन कोल्हे, अनिरुद्ध येचाळे, एच व्ही निंबाळकर, विजय खोसे, उमेश कांबळे, केदार सर, नवनाथ गोजमगुंडे, सुरज कोल्हे, रामचंद्र केंद्रे, आशिष पडिले, संतोष पांचाळ,
पद्माकर उगीले, व्यंकटेश पुरी, करीम तांबोळी, रंगनाथ घोडके, सुधीर अनवले, बाळकृष्ण धायगुुडे, मंगेश सुवर्णकार, सर्फराज मणियार, नेताजी बादाडे यांच्यासह मान्यवरांनी आपआपल्या संस्था व संघटनाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला.
ओबीसी आरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेला हा सर्वात मोठा मेळावा ठरला. या मेळाव्यात आंदोलनाला दिशा मिळेल असा आशावाद निर्माण झाला. आरक्षण पुनर्स्थापित व्हावे यासाठी त्या-त्या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार व खासदारांना निवेदने द्यावीत. आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थापीत होणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणूका घेऊ नयेत असे ठरावही या मेळाव्यात घेण्यात आले. विविध संस्था संघटनाच्या वतीने यावेळी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करणारी पत्रे यावेळी समितीकडे सुपूर्द करण्यात आली.
चौकट १
प्रयत्नाची पराकाष्ठा करू-छगन भुजबळ
या मेळाव्याला ऑनलाईन मार्गदर्शन करताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाचे पाय ओढण्याचे काम आजवर करण्यात आलेले आहे. इम्पेरिकल डाटा न दिल्याने आरक्षण स्थगित झालेले आहे. हा डाटा ही कोणच्या घरची संपत्ती नाही. केंद्र सरकारने तो दिला नाही तरीही न्यायालयात सादर करण्यासाठी डाटा जमा करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. आरक्षण कायम रहावे यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जात आहोत. राज्य सरकारने त्यासाठी आयोगाची स्थापना केलेली असून डाटा जमा करण्याचे काम सुरु आहे असेही ते म्हणाले.
चौकट २
ओबीसीची नवी मशाल पेटविणार-विजय वडेट्टीवार
मेळाव्याला संबोधीत करताना राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माती व नाती हे ओबीसी समाजाचे समिकरण असल्याचे सांगितले. आता जातीच्या पलीकडे जाऊन नाते जोडायचे आहे. ओबीसी हा अनेक जातींचा समुह आहे. या सर्व जातींसाठी नवी मशाल पेटवायची आहे. सर्वांनीच आपआपल्या पक्षाचे जोडे बाहेर ठेऊन मुठ बांधायची आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, कोणाचे आरक्षण हिसकावून घेणार नाही परंतू जे आजपर्यंत आमच्यासाठी होते ते सोडणार नाही. संसदेत कांहीही झाले तरी आम्ही लढा सोडणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
चौकट ३
आरक्षण लढ्यासाठी तुमच्या सोबतच-पंकजाताई मुुंंडे
माजी मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, आरक्षण ही ओबीसीची कवचकुंडले असून ही कवचकुंडलेही हिरावून घेण्याचे काम झालेले आहे. आरक्षण पुर्ववत व्हावे यासाठी सर्वच समाजबांधवांनी पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन एकत्रीत लढा देणे आवश्यक आहे. हा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरु ठेवणे गरजेचे असून या लढण्यात मी कायम तुमच्यासोबत राहील असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिला.
चौकट ४
सरकारवर सकारात्मक दबाव आणावा-योगेश टिळेकर
ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संपुष्टात आलेले आहे. मात्र हे आरक्षण पुन्हा स्थापीत व्हावे याकरीता ओबीसी समाजाच्या वतीने आता आंदोलन सुरु झालेले आहे. या आंदोलनात सर्वांनीच राजकीय जोडे बाजुला ठेऊन एकत्रीत येऊन सहभागी होऊन आवश्यक आहे. त्याचबरोबर आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारवर सकारात्मक दबाव आणावा असे आवाहन भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले.
चौकट ५
सर्वपक्षीय ओबीसी एकत्रित आल्याचा आनंद-महापौर विक्रांत गोजमगुंडे
आपल्या उद्घाटनपर भाषणात महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या न्याय मागण्या आणि हक्कांसाठी सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी एकत्र आले याचा मनस्वी आनंद वाटतो. आरक्षण हा समाजाचा हक्कच आहे पण असे असतानाही इम्पेरिकल डाटा वेळेत न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते स्थगित केलेले आहे. हे आरक्षण पुनर्स्थापीत होईपर्यंत आपण स्वस्थ बसू नये त्यासाठी सर्वपक्षीय नेते व पदाधिकार्यांनी एकत्र येऊन योग्य दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे. असे झाले तर लवकरात लवकर आरक्षण पुनर्स्थापीत होईल. ओबीसींचा लढा कोणत्याही पक्षनेते अथवा समाजाविरोधात नसून केवळ ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आहे.
ओबीसींसाठी न्यायालयिन लढा उभारणार- ॲड अण्णाराव पाटील
ओबीसींचा न्याय हक्क मिळावा यासाठी न्यायालयीन लढा उभारणार असून न्यायालयात आपण ओबीसींची योग्य बाजू मांडणार आहोत. ओबीसींना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मनोगत ॲड अण्णाराव पाटील यांनी अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.