विवेकानंद रुग्णालयाकडून सेवाभावाला बळ देण्याचे काम -भैय्याजी जोशी
स्व.सुरेशराव केतकर गुणवंत कर्मचारी पुरस्कारांचे वितरण
लातूर/प्रतिनिधी: सेवा हा भारतीय समाजाचा स्वभाव आहे.सेवा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.विवेकानंद रुग्णालया सारख्या संस्था अशाच सेवाभावाला बळ देण्याचे काम करतात,असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या स्व. सुरेशराव केतकर गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात भैय्याजी जोशी बोलत होते. मंचावर जिल्हा संघचालक संजय अग्रवाल,संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुणा देवधर, कार्यवाह डॉ.राधेश्याम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका,डॉ.सौ.
ज्योत्स्नाताई कुकडे काकू, रुग्णालयाचे प्रशासनिक संचालक अनिल अंधोरीकर, डॉ.दिलीप देशपांडे यांच्यासह विश्वस्त,सर्व डॉक्टर्स,कर्मचारी,अभ्यागत,संघ कार्यकर्ते,प्रचारक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की, कर्तव्याचे पालन करणे याला धर्म असे म्हटले जाते.सेवा हा धर्मच आहे.सेवेचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही.गुणवत्ता असेल तरच बीज अंकुरण्याची प्रक्रिया घडत असते. त्यासाठी सुपीक जमीन आणि पोषक हवामान आवश्यक असते.शेती करणारा शेतकरीही चांगलाच असावा लागतो. लातूर सारख्या ठिकाणी या सेवेचे बीजारोपण झाले.विवेकानंद रुग्णालयात सेवेचे बीज अंकुरले.पोषक वातावरणामुळे त्याची वाढ झाली.कुकडे काका व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे त्याचे आज मोठ्या सेवाकार्यात रुपांतर झाले असल्याचे भैयाजी जोशी म्हणाले.
कुठल्याही व्यक्तिमत्वात गुणवत्ता आप आणता येत नाही,ती मूलतः असावीच लागते. गुणवत्तेचा संबंध असण्याशी असतो दिसण्याशी नाही. गुणवत्ता असेल तर विविध सन्मान व पुरस्कार चालत येत असतात.कुठलाही पुरस्कार मागुन मिळत नाही. रुग्णालयात काम करणारे सर्वजण समाजाच्या प्रेमास पात्र आहेत.ही केवळ नोकरी नाही तर त्याचा जीवनाशी संबंध आहे.काही व्यक्तींच्या कार्यामुळे रुग्णालयाची ओळख व कार्याची उंची वाढत असते,असेही ते म्हणाले.
यावेळी नर्सिंग विभागातून सौ.सुमेधा सुरवसे,सौ संगीता जंगापल्ले,आयसीयू विभागातून भगवान अंकुश, स्त्रीरोग व प्रसूती विभागातील सौ.मंगल आगाशे,महिला स्वच्छता विभागातून सौ. कृष्णा चांडोले,सौ.छाया भक्ते, टेक्निशियन व फार्मसिस्ट विभागातून नितीन क्षिरसागर व अविनाश गडीकर,चौकी विभागातून रमेश वाळके, सचिन जगताप,प्रशासनिक विभागातून सौ.स्वाती कोळी, बाळासाहेब पांचाळ तर निवासी वैद्यकीय अधिकारी विभागातून डॉ.अंजली सावरगावकर व डॉ. बाजीराव जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना संकटाच्या काळात योग्य नियोजन आणि सर्व यंत्रणेचे सक्षमीकरण करत यंत्रणा गतिमान करणारे प्रशासनिक संचालक अनिल अंधोरीकर यांचाही यावेळी भैय्याजी जोशी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
कार्यवाह डॉ.राधेशाम कुलकर्णी यांनी कोरोना संकटाच्या काळात दीड हजार रुग्णांवर उपचार केल्याची माहिती दिली. या काळात गरजू रुग्णांना १२ लाख रुपयांची सवलत दिली. कर्मचाऱ्यांनी अधिक मानधन न घेता सेवा केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
पुरस्कार विजेत्या मधून अविनाश गडीकर,सौ.संगीता जंगापल्ले,डॉ.बाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. सुरेशराव केतकर यांच्या केतकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.सौ अरुणा देवधर,डॉ.राधेश्याम कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.विनय दीक्षित यांनी वैयक्तिक गीत सादर केले.डॉ राधेशाम कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.सौ मीरा कुलकर्णी यांनी प्रार्थना म्हटल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास रुग्णालयातील डॉक्टर ,
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.