शेतकऱ्यांना हमीभाव आणि ग्राहकाला योग्य दरात दाळ पुरवठ्याचे धोरण- पीयूष गोयल
पाशा पटेल यांच्यासमवेत बैठकीत घेतला परिस्थितीचा आढावा
दरवाढीसाठी साठवणूक न करण्याचा इशारा
लातूर/प्रतिनिधी:व्यापाऱ्यांवि षयी सरकारच्या मनात कोणताही पूर्वग्रह नाही.पण शेतकऱ्यांना हमीभाव आणि ग्राहकाला योग्य दरात दाळीचा पुरवठा व्हावा हे केंद्र सरकारचे धोरण आहे.दरवाढीसाठी व्यापाऱ्यांनी दाळींची साठवणूक करू नये,असा इशारा केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिला आहे.
विद्यमान परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी डाळीच्या साठवणुकीवर बंदी घातली. त्यानंतर देशभरात व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली.या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना एकंदर परिस्थितीची माहिती देण्यासंदर्भात सुचवले होते. त्या अनुषंगाने मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पीयूष गोयल आणि पाशा पटेल यांची बैठक झाली.यात पाशा पटेल यांनी एकंदर परिस्थितीची महिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.
या बैठकीस व्यापारी प्रतिनिधींचीही उपस्थिती होती.
सरकारच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. साठवणुकीच्या मर्यादा आल्याने डाळींच्या दरामध्ये ५०० ते १ हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये डाळी विकाव्या लागत आहेत.या विषयात वाणिज्य मंत्र्यांनी लक्ष घालावे.शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे.डाळींचा हंगाम संपलेला असून सरकारने हमीभावाची खरेदी केंद्र बंद केली आहेत.मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता तेजी-मंदीचा फायदा घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी माल घरात ठेवलेला आहे.त्यांना आता कमी दरात विक्री करावी लागत आहे,अशी माहिती पाशा पटेल यांनी या बैठकीत पियुष गोयल यांना दिली.
यावेळी बोलताना गोयल यांनी काही व्यापारी शेतकऱ्यांच्या आडून भाववाढ करत असल्याचे सांगितले.कोविडमुळे बाजारपेठेत उठाव नसल्याचे सांगितले जात असताना दरवाढ कशी होते ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा स्थितीत ग्राहकांची लूट होऊ नये याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गरज पडली तर सरकार पुन्हा एकदा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करू शकते.जे व्यापारी प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत त्यांचेही या स्थितीत नुकसान होत आहे.ठराविक व्यापारी अनैतिक पद्धतीने व्यापार करत असून अशांची गय केली जाणार नाही.जे व्यापारी प्रामाणिक आहेत त्यांना त्रास होऊ नये अशीच सरकारची भूमिका आहे.परंतु साठवणूक करून दरवाढ करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा गर्भित इशाराही त्यांनी या बैठकीत बोलताना दिला.
शेतकऱ्यांना हमीभाव व ग्राहकाला योग्य दरात डाळीचा पुरवठा व्हावा यासाठी दीर्घकालीन धोरण सरकार तयार करणार असल्याचे पियुष गोयल म्हणाले.या विषयासंदर्भात अमित शहा यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असून त्यानंतर नव्या धोरण निर्मितीला गती येईल अशी माहितीही त्यांनी दिली.
पाशा पटेल यांना
दिल्लीचे निमंत्रण ....
डाळी संदर्भात दीर्घकालीन धोरण केंद्र सरकार तयार करत आहे.याचा निश्चित मसुदा तयार करण्यासाठी पाशा पटेल यांनी केंद्र सरकारला मदत करावी. त्यांनी दिल्लीत येऊन या नव्या कायद्याचा मसुदा तयार करून द्यावा,असे निमंत्रणही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी पाशा पटेल यांना या बैठकीच्या निमित्ताने दिले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.