नानाच महाराष्ट्रात काँग्रेस मोठी करु शकतात ;
पवारांचे ' छोटा माणूस ' हेच मोठे प्रमाणपत्र..!
-------- ------- -------- -------- -------- -----------
महाराष्ट्रात बहुधा काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता बळावली आहे.कारण आघाडी सरकारातील घटक पक्षासह , विरोधकांच्या नजरा नानांच्या हालचाली कडेच आहेत.भाजपा नानांना पप्पू म्हणून हिनवण्याचा प्रयत्न करतो आहे.तर पवार साहेबा सारखे खूप मोठे नेते, नानां छोटा माणूस असल्याचे सांगून , नानांच्या उंचीला खुजं करु पहात आहेत.मुख्यमंत्री जेंव्हा स्वपक्षाच्या बैठक मेळाव्यात , शिवसैनिकांना स्वबळासाठी तयार राहा , असे आदेशीत करतात तेव्हा नानांच्या वाटचालीचा तो एक धसकाच आहे , हे सिद्ध होते.आघाडी सरकार चालवणे एक कसरत असते.सर्वांनाच झुकते माप हवे असते.पण ज्यांच्या हाती सत्तेची मोठी पदे एकवटलेली असतात , त्यांच्या पदरात अधिकचे कांही पडत असते.दुसरा टेकू पक्ष भिक्षांदेही वरच अवलंबून असतो.काँग्रेस सध्या त्याच मार्गावरुन चालत आहे.
पक्ष म्हणजे , पक्षाचे कार्यकर्ते ; नेत्यावर , मंञ्यावर पक्ष चालत नसतो.पक्षाचा नेता गोरा गोमटा असून चालत नाही तर कार्यकर्त्यांच्या गोतवाळ्यातला असला पाहीजे.आणि असा गोतवाळा सांभाळण्याची कला अथवा अक्कल ज्या नेत्याकडे असते , त्याचा परिसर पक्षमय होतो.काँग्रेस मध्ये नेते आजही खूप आहेत.चिल्लर कार्यक्रमासाठी 30 बाय 40 चे व्यासपीठ उभारावे लागते.पण समोर किंवा आजूबाजूला कार्यकर्ता नावाचा प्राणी दिसतच नाही.आणि दिसणार कसा ? गेल्या वीस वर्षात काँग्रेस , पक्षाचा आधार कार्यकर्ता आहे , ही गोष्ट विसरुनच गेला आहे.आता पक्षाच्या नेत्याच्या मागेपुढे जे टोळकं फिरतं , ते कार्यकर्त्यांचं नसतं.तो स्तुतिपाठक चमच्यांचा समूह असतो.हे कार्यकर्ते जनतेच्या समस्या , जनतेचे प्रश्न , नेत्यासमोर मांडतच नाहीत .त्यांना फक्त त्यांचे आणि फार तर पाहूण्या रावळ्यांचे पडलेले असते.देशात काँग्रेसच्या पराभवाचे कारण ,कार्यकर्त्यांचा अभाव हे आहे.आणि भाजपाच्या विजयाचे कारण कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे आहे.आठवण करा , 1985 ते 1990 पर्यंत भाजपाचा कार्यकर्ता शोधावा लागत होता.परंतु त्या नंतरच्या वीस वर्षात भाजपाने '' कार्यकर्ता '' या संज्ञेला प्रथम स्थान दिले.आणि भाजपा सत्तेत आली.ज्या बंगाल मध्ये , भाजपाला पाय ठेवायला जागा नव्हती , त्या बंगालात भाजपा सर्वाना बाजूला करुन मोठ्या संख्या बळासह विरोधी पक्ष म्हणून मजबूतीने उभा राहतो.ही किमया , कार्यकर्त्यांची असते.नेत्यांची नव्हे .
नानांना हे गणित चांगले उमगले आहे.काँग्रेस मोठी करायची असेल तर कार्यकर्ता उभा केला पाहीजे , हे धोरण त्यांनी स्वीकारले आहे.आणि नानांची गेल्या चार सहा महिन्याची वाटचाल पहाता , नाना कार्यकर्ते जोडत आहेत,नाना कार्यकर्त्यांना आधार देत आहेत.नाना तासनं तास कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेत आहेत.आणि आपण पहा , नानांच्या या धोरणाला भविष्यात मोठे यश मिळालेले आपणास पहायला मिळणार आहे.
सहकारी किंवा विरोधी पक्षाचे लोक जेव्हा नानावर अटकल पटकलीने तुटून पडतात तेव्हा, नाना काँग्रेस मोठी करीत आहेत हे ध्यानी धरावे.
महाराष्ट्रात आता पुढील किमान दहा वर्ष एका पक्षाचे सरकार स्थापन होणारच नाही.मग तो कोणताही पक्ष असो.स्वबळावर बहूमत ही संकल्पनाच सध्या मोडित निघाली आहे.आज कोण मोठा पक्ष ठरणार आणि आघाडीचा जुगाड कोण करु शकणार , एवढाच प्रश्न आहे.विचारधारा , ध्येय धोरणे वगैरे किमान समान कार्यक्रम , या गोंडस नावा पुढे नतमस्तक आहेत.महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करु शकेल अशी परिस्थिती भविष्यातही येणार नाही , याची कल्पना नानांना आहेच.नानांचा प्रयत्न आहे तो , सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याचा.आणि सध्या त्यांनी हाती घेतलेली मोहीम इतर पक्षांची धास्ती वाढवणारीच आहे.
एक लक्षात घ्या , शरद पवार साहेबा सारखा मोठा माणूस जेव्हा नानांना छोटा माणसांची उपाधी देतो , तेव्हा नानांचे मोठेपण अधिक उठावदार होते.नाना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनून , मराठवाडा , खानदेश , विदर्भात भाषणे ठोकीत फिरत नाहीत , तर थेट पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात संघटन बांधायला निघतात , ही बाब छोटी नाही.
कांही असो , नानांनी काँग्रेस हलवली आहे.मरगळ झटकण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.आघाडी सरकार मध्ये , काँग्रेस अधिक काळ राहील , असे वाटत नाही.आणि हे सरकार समान न्यायाच्या धोरणावर चालले नाही , तर नानाच या सरकारच्या समारोपाचे भाषण करतील अशी चिन्हे आहेत.दिल्लीत नानांच्या भूमिकेचं समर्थनच होईल.काँग्रेस हायकमांड नानांच्या धोरणाला पाठींबाच देतील, इतकी पक्षहीतकारक भूमिका घेऊन नाना मोहीमेवर निघाले आहेत.आम्ही त्यांच्या वाटचालीला मनस्वी शुभेच्छा देतो आणि देशाचे नेते श्री शरद पवार साहेबाकडून छोटा माणूस , ही मोठी उपाधी मिळवल्या बद्दल नानांचे अभिनंदनही करतो.
---- राजू पाटील , औसा.
#NanaPatole #AshokChavan #MpCongress #BalasahebThorat
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.