बकरी ईद सणानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात वाहतूक नियंत्रण व नियमनात्मक आदेश जारी.
अल्ताफ शेख, प्रतिनिधी/
उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 21 जुलै 2021 रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून एक दिवस मागे पुढे) बकरी ईद हा सण आहे. हा सण जिल्ह्यात शांततेत पार पडावा यासाठी सणाच्या वेळी वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तणावाची परिस्थिती निर्माण झाली तरी त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकाऱ्यांना दिनांक 20 जुलै 2021 रोजीच्या रात्री 12:00 वा. ते दिनांक 23 जुलै 2021 रोजीचे रात्री 12:00 वाजेपर्यंत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. रस्त्यांवरील किंवा रस्त्यांवरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात किंवा कोणत्या मार्गाने जावू नयेत ते मार्ग विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी प्रार्थनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे, ही जबाबदारी या अधिकाऱ्यांनी पार पाडावयाची आहे. सर्व रस्त्यावरील. नद्यांचे घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानाच्या, कपडे धुण्याच्या ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमन करणे, किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 33, 34, 37 ते 41 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आवश्यक आहे. जो कोणी नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल, असेही जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.