दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्याची नोडल एजन्सी म्हणून लातुरच्या 'संवेदना'ची निवड
लातूर/प्रतिनिधी:देशातील बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने न्यासचे काम चालते. या न्यासकडून प्रत्येक राज्यामध्ये स्टेट नोडल एजन्सी म्हणून एका संस्थेची नियुक्ती करणे आवश्यक असते. रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या संवेदना प्रकल्पाचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य समन्वय समितीच्या सदस्य सचिवपदी संस्थेची निवड झाली असून हा लातुरकरांचा बहुमान आहे.
राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम, १९९९ अन्वये ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी,मतिमंद व बहुविकलांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यासाची स्थापना करण्यात आलेली आहे.राष्ट्रीय न्यास अशा व्यक्तींसाठी विविध योजना तसेच कार्यक्रम देशामध्ये राबवित आहे. उपरोक्त अधिनियमाच्या कलम १३ अन्वये स्थानिक स्तरावरील समिती गठीत करण्याची तरतूद आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये स्थानिक स्तरावरील समित्या गठण करण्याचे काम या नोडस एजन्सीचे असते. राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम १९९९ च्या अनुषंगाने राज्यस्तरावरुन पर्यवेक्षण करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीचे हे कार्य आहे.केंद्र शासनाच्या पत्रान्वये,राष्ट्रीय न्यास नवी दिल्ली यांनी महाराष्ट्र राज्याची नोडल एजन्सी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती द्वारा संचलित संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र या संस्थेची निवड केली असल्याचे कळविले आहे.त्यामुळे लातुरातील संस्थेच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली गेली आहे.
संवेदना प्रकल्पाने दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.प्रकल्पाचे कार्यवाह सुरेश पाटील यांचे उत्कृष्ट नियोजन आणि दिव्यांगांसाठी काम करण्याची तळमळ पाहता तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही संस्थेला मदतीसाठी हात पुढे केला होता.त्यांच्या पुढाकारातून संस्थेने दिव्यांग व्यक्तींना वाटप केलेल्या साहित्याची नोंद राज्य व देशपातळीवरही घेण्यात आलेली आहे.विशेष म्हणजे या उपक्रमात संबंधित दिव्यांगांकडून काही रक्कम भरून घेणे अपेक्षित होते. अशावेळी दिव्यांगांना झळ पोहोचू नये याची काळजी घेत जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठीचा वाटा स्वतः उचलला होता.यासाठी ४६ लाख रुपये शासनाकडे जमा केले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित संवेदना या प्रकल्पाची समितीच्या सदस्य सचिवपदी झालेली निवडच संस्थेच्या कार्याची महती सांगणारी आहे.यामुळे लातूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.