रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत लातूर - तिरुपतीसह
विविध रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी
लातूर, दि. ०१ : रेल्वे सल्लागार मंडळाचे सदस्य आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुधवारी वेबिनारच्या माध्यमातून पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत लातूर - तिरुपती, लातूर - पुणे इंटरसिटी फास्ट पॅसेंजर, लातूर - कोटा अशा विविध रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी करण्यात आली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या मागण्यांबाबत वरिष्ठांशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेबिनारच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीस सोलापूरचे एसीएम. रामदास भिसे, श्रीमती सुधा मॅडम, सीसीआय शुभम थोरात, लातूरचे स्टेशन मास्टर तिवारी, टीआय आर.बी. गायकवाड, शेखर गोखले, रेल्वे सल्लागार मंडळाचे सदस्य केयूर कामदार, अशोक गोविंदपूरकर, नंदकिशोर अग्रवाल, सचिन मुंडे, एड. विक्रम पाटील, विलास पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या बैठकीत केयूर कामदार यांनी लातूरहुन लातूर - तिरुपती, लातूर - पुणे इंटरसिटी फास्ट पॅसेंजर, लातूर - कोटा या नवीन रेल्वे गाड्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात अशी मागणी केली. त्याचप्रमाणे जसे लातूर हे शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते तसेच राजस्थानमधील कोटा शहरही शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते. या दोन शहरांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येथे ये - जा करतात. त्यामुळे ही दोन शहरे रेल्वेने जोडली गेल्यास विद्यार्थी व पालकांची मोठी सोय होऊ शकणार आहे. तसेच लातूर रेल्वे स्थानकावर लिफ्टची व्यवस्था केली जावी, अधिकृत हमाल उपलब्ध व्हावेत, स्वयंचलित जिन्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशा आग्रही मागण्या कामदार यांनी लावून धरल्या . नागपूर - कोल्हापूर, पुणे - हैदराबाद, अमरावती - पुणे या गाड्या दररोज सोडण्यात याव्यात असेही यावेळी सुचविण्यात आले. नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी लातूर रेल्वे स्थानकावर रेल्वेने जागा उपलब्ध करून दिल्यास मनपाच्या वतीने पालकमंत्र्यांकडून तात्काळ बाथरूमची उभारणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. शहरातील जुन्या रेल्वे स्थानक परिसरात तिकीट बुकिंग काउंटर आहे. त्याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी बेंच, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच बाथरूमची व्यवस्था केली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या न्याय मागण्यांना सर्व सदस्यांनी समर्थन देऊन त्याची लवकरात लवकर पूर्तता करण्याचा आग्रह धरला. हरंगुळ येथील रेल्वे स्थानकानजीक मालवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली गेल्यास रेल्वेचा महसूलही वाढेल आणि व्यापाऱ्यांचीही सोय होईल,अशी मागणी लावून धरण्यात आली. या सर्व मागण्यांना रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.