*मांजरा परिवारातील कारखान्यांनी दहा दिवसात एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिले द्यावीत*
*अन्यथा क्रांतीदिनी शेतकऱ्यांचे आंदोलन- आ. रमेशअप्पा कराड*
जिल्हयातील शेतकऱ्याचं अर्थकारण ऊस पिक व साखर उद्योगाशी निगडीत असून मांजरा परिवारातील मांजरा, विलास, विलास-२ आणि रेणा या चारही साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाला एफआरपी नुसार फरकाची रक्कम दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा येत्या ९ ऑगस्ट २०२१ क्रांतीदिनी साखर कारखान्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी एका निवेदनाद्वारे संबंधीतांना दिला आहे.
मांजरा परिवारातील मांजरा कारखान्याने ५ लाख ७८ हजार मॅ.टन ऊसाचे गाळप केले असून प्रतिटन २२७५/- रूपये एफआरपी प्रमाणे भाव देणे अपेक्षित आहे. विलास कारखान्याने ५ लाख ३८ हजार मॅ.टन गाळप केले त्यांचा २६९९/- रूपये तर विलास-२ (तोंडार) कारखान्याने ३ लाख ३ हजार मॅ.टन गाळप केले. त्यांचा २५३४/- रूपये भाव निघतो आणि रेणा साखर कारखान्याने ४ लाख ३७ हजार मॅ.टन उसाचे गाळप केले त्यांचा २८५६/- रूपये एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचा भाव देणे बंधनकारक आहे. मात्र या चारही कारखान्यांनी केवळ २२००/- रूपये प्रतिटन प्रमाणे भाव शेतकऱ्यांना दिला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्येक वर्षी शेतकरी कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडत असून गेल्या दिड दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला मदत करणे ही काळाची गरज असतानाही साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिले देणे गरजेचे आहे. मात्र अद्याप पर्यंत देण्यात आलेला नाही.
मांजरा परिवारातील चारही कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे निघालेला भाव आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अदा केलेले बिल यातील फरकाची रक्कम प्रतिटन मांजरा कारखाना ५७५/- रूपये, विलास कारखाना ४९९/- रूपये, विलास-२ (तोंडार) ३३४/- रूपये, रेणा कारखाना ६५६/- रूपये याप्रमाणे दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अन्यथा येत्या ९ ऑगस्ट २०२१ क्रांती दिनी संबंधीत कारखान्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी साखर आयुक्त, साखर संचालक, प्रादेशिक साखर सहसंचालक, जिल्हाधिकारी, तहसिलदार, मांजरा, विलास, विलास-२ आणि रेणा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.