कोण संपवीत आहे अखेर ,
गोपीनाथ मुंडेंच्या कर्तबगार लेकींना ?
---------- --------- ---------- -------------
होय , मी तुम्हा सर्वांच्या मनातल्या प्रश्नांची उकल करु पहातोय.महाराष्ट्र भाजपाच्या क्रमांक दोन च्या झुंजार नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्याच भगिनी खा.प्रितम मुंडे यांना पद्धतशीर पणे संपवण्याचा पुणेरी पगडी डाव गेल्या विधानसभा निवडणूकी पासून मांडला गेला आहे.आणि पहिल्याच फटक्यात पंकजांच्या विरोधकांना राजकीय रसद पुरवून पराभूतही केले आहे.इथेच ही पगडीचाल थांबली नाही , तर विधान परिषदेच्या निवडणूकीत पंकजांचेच मानस बंधू रमेश कराड यांना उमेदवारी देऊन वरच्या सभागृहाचे दरवाजे पंकजासाठी बंद केले आहेत.पंकजांनी या पगडी डावा विरुद्ध बंड करु नये , किंवा भाजपाला कोलून पक्षांतर करु नये , यासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यकारणीत झुटूकमुटूक पद देऊन त्यांचे पायही बांधले आहेत .देश पातळीवर काम करण्याची संधी वगैरे , अशी रायंदरी भलामन करीत.
इथेच हा पगडी कावा संपला नाही तर , डाँ.प्रितम मुंडे लोकसभेच्या खासदार असतांना , वंजारी समाजाचे त्या नेतृत्व करीत असतांना , पुन्हा एक खेळ या पगडीपठ्याने मांडला आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावान सहकारी डाँ.भागवत कराड यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले.आणि आता तर प्रितम मुंडे यांना डावलून त्यांना केंद्रात राज्यमंञीही केले.हे सगळं केंद्रिय नेतृत्वाने केले , असं जे जे अभ्यासक(?)म्हणतील , एक तर ते मुर्ख आहेत किंवा गोपीनाथ मुंडे परिवार राजकारणातून संपवण्याच्या कटात मानसिकतेने सहभागी आहेत.
भाजपाला प्रितम मुंडे , पंकजा मुंडे सक्रिय राजकारणात नको आहेत का ? तर याचे उत्तर आहे , हव्या आहेत.हव्या तर आहेत , तर मग त्यांचे पंख का छाटले जात आहेत ? वंजारी किंवा ओबीसी समाजातले नवे नेतृत्व का उभे केले जात आहे ? ही तर खरी गोम आहे.आणि यालाच आम्ही पगडी डाव हे नाव दिले आहे .पंकजा एक बहाद्दूर नेत्या आहेत.आपल्या वडिलांचे सर्व राजकीय संस्कार त्याच्यात ठासून भरलेले आहेत.शिवाय संघटन आणि नेतृत्व कौशल्य, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणेच पंकजाताई मध्येही आहे.त्यांचे व्यक्तिमत्व उत्तम आहे.वक्तृत्व उत्तम आहे .कर्तृत्व उत्तम आहे .आणि एखाद्या खात्याचीच काय , संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी पेलण्याची धमकही त्यांच्यात आहे.आणि हीच धमक त्यांना अडचणीची ठरली आहे .
राज्यात भाजपाची धूरा देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आहे.पाच वर्ष ते मुख्यमंत्रीही राहीले आहेत.आणि भविष्यात हा महाराष्ट्र आपल्याच सातबारावर राहीला पाहिजे अशी त्यांची अतितीव्र इच्छाही आहे.आणि त्यासाठी ते स्पर्धेत असणाऱ्या किंवा येऊ शकणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांचे अस्थित्व लुळेपांगळे करीत आहेत.हा लेख वाचणार्या प्रत्येकाला हे विधान मनोमन मान्यही होणारे आहे.अर्थात गोपीनाथ मुंडेंच्या दोन्ही कन्येचे पंख छाटून त्यांना मताच्या गणिता पुरतेच राजकारणात ठेवायचे , ही फडणवीसांची पगडीनीति आहे.याचा सरळ अर्थ , देवेंद्र फडणवीस हेच पंकजा आणि प्रितम यांना संपवीत आहेत, हे सिद्ध होते.
आता विषय आहे , या दोन बहिणींच्या भूमिकेचा.देवेंद्र फडणवीस आपला पद्धतशीर काटा काढीत आहेत , हे न कळण्या इतपत , या दोन्ही भगिनी दुधखुळ्या नाहीत.आज आपण ज्या विषयावर बोलतोय , तो विषय त्यांना केंव्हाच माहीत आहे.इथे प्रश्न निर्माण होतो की , तर मग त्या गप्प कशा ? आणि अशी कोणती गोष्ट आहे की , त्यांना आवाज करु देत नाही ? कांहीही झालं तरी आम्ही पक्षाबरोबर आहोत , नेते ठरवतील त्याप्रमाणे काम करु , देतील ती जबाबदारी पार पाडू , असं मनात नसतानाही त्या बोलून जातात, बोलत राहतात ? काय नेमकं ? स्व.गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर ? ते असचं बोलत राहीले असते काय ? ज्या महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपा उभी केली , तीच भाजपा मुंडेंच्या कन्येला राजकारणातून संपवण्या साठी डावावर डाव टाकते ? आणि मुंडेंच्या कन्यांही हा धडधडीत अन्याय निमुटपणे सहन करतात ? हा काय प्रकार आहे ? हा प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू हा , की गोपीनाथ मुंडे परिवाराचे जीवनच सार्वजनिक आहे.आणि त्यांच्या दोन्ही कन्या , केवळ कन्या नाहीत तर महाराष्ट्रातील तमाम वंजारी समाजाच्या आणि ओबीसींच्या सुख दुःखाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मजबूत धमन्या आहेत.
पंकजा , प्रितमने काय करावे , कोणती भूमिका घ्यावी , पक्षा विरोधात संघर्ष करावा की करु नये , हा त्या दोघींचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण जेव्हा आपण स्वतःला महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री , असं म्हणवून घेता , तेव्हा महाराष्ट्रातील जनतेलाही हा हक्क पोंहचतो की , आपण आपले ध्येय , आपली भूमिका स्पष्ट करावी.पंकजाताई , प्रितमजीवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते , त्यांच्या आधाराची वाट पहाणारा , लाखोंचा समाज किती दिवस असा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणारा आहे ?
कांही असो , पगडी धोरण जोरात आहे.खडसेंना पक्षातून बाहेर पडायला , या धोरणाने भाग पाडले आहे .पण ते बाहेर पडले त्याचीही हेडलाइन फडणवीसांनी होऊ दिली नाही .किंवा त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सोहळेही संपन्न होऊ दिले नाहीत .पंकजाताईंचे भविष्यात असे होणार काय ? किंवा ऐन निवडणूक काळात त्यांना इकडे आड तिकडे विहिर , अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागणार का ? हा प्रश्नही आज अनुत्तरीतच आहे.
नवे केंद्रिय राज्य मंञी डाँ.भागवत कराड हे एक सालस व्यक्तिमत्व आहे.समाजावर , विभागावर , संघटन कौशल्यावर ,किंवा मराठवाड्याच्या राजकारणावर त्यांचे प्रभुत्व नसले तरी , प्रितम मुंडेच्या पायातला सुवर्ण साखळदंड मात्र ठरले आहेत.त्यांना स्वतःलाही हे माहिती असेल किंवा असावे की , त्यांच्या मुळे एखादी खाजदारकीची अथवा एखादी आमदारकीची जागा वाढण्याची सुतराम शक्यता नाही.भाजपाने त्यांना बहाल केलेले मंञीपद हे पाहूण्याच्या हाताने साप मारणे , इतक्याच हेतूचे आणि तेवढ्याच ऐपतीचे आहे.मंत्री रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट करण्याचा डावही फडणवीसानी आखला होता.मात्र एकाच वेळी पक्षांतर्गत विरोधकांची संख्या वाढू नये , म्हणून वेळ पुढे ढकलली आहे.रविशंकर प्रसाद किंवा प्रकाश जावडेकर यांना डच्चू मिळतो आणि रावसाहेब टिकून राहतात , किंवा ठेवले जातात , हा सुद्धा पगडी धोरणाचाच एक भाग आहे.आणि हो , जाता जाता ; राधाकृष्ण विखे पाटील सध्या कुठे आहेत ? हर्षवर्धन पाटील कुठे आहेत ? राणेंना आत्ताच मंत्री मंडळात का घेतले ? कपिल पाटील यांना मंत्रीपद देतांना आगरी समाज का आठवला ? असे प्रश्नही चिकित्सक वाचकांनी उपस्थित करुन , त्याची उत्तरे शोधायला नकोत काय ?
पंकजाताई आणि प्रितमजींचे पंख छाटण्याचे काम देवेंद्रजी सफाईदारपणे करीत आहेत.त्यात त्यांना मोठे यशही आले आहे.पण आणखी कोण कोण पगडी धोरणात अडकले आहेत आणि त्यांचे पुढे काय होणार आहे , हे आपण पहात राहू , आणि आवश्यक वाटले तर बोलू.तुर्तास ना.भागवत कराड यांना भावी कारकिर्दी साठी खूप खूप शुभेच्छा !!
-- राजू पाटील,औसा.
Dr Pritam Gopinath Munde Pankaja Gopinath Munde
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.