बकरी ईद-२०२१ बाबत मार्गदर्शक सूचना.
कोविड १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविंडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणत एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. या वर्षी दि. २१ जुलै, २०२१ रोजी "बकरी ईद" (चंद्र दर्शनावर अवलंबून) असुन ती अत्यंत साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरुन खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.:
१. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
४. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain Dated ४/६/२०२१ आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
६. कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२१०७०२१११०४२८७२९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.