महार्मागालगतच्या पाणी प्रश्नांसाठी स्वाक्षरी मोहीम
शेतकऱ्यांची पोरं संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
औसा प्रतिनिधी विलास तपासे
येथील औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतीचे व घरांचे नुकसान होत आहे. सदर पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी (ता.२२) निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची पोरं संघटनेच्या वतीने देण्यात आला.
औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी (ता. औसा) येथे पावसामुळे येणाऱ्या रस्त्यालगतच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मागील आठवड्यापासून परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे महामार्गालगत मोठया
प्रमाणावर पाणी जमा होत आहे. यामुळे येथील शेतींचे, व्यवसायाचे आणि राधानगर भागातील घरांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच यामुळे ग्रामस्थ, प्रवाशी आदींचे हाल होत आहेत.
महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने पाण्याचे व्यवस्थापन केले नाही. याठिकाणी कंपनीकडून पाणी जाण्यासाठी नालीचे बांधकाम केले आहे परंतू ती नाली येथील पाणी जाण्यासाठी अपुरी आहे. एवढच नाही तर हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची ठिकठिकाणी पडझड देखील झाली आहे. सद्यस्थितीत नालीमध्ये कचरा, माती आदी अडकल्याने पाणी जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी एन पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या परिस्थितीची जाणीव महामार्ग प्रशासनाला करुन दिली होती. परंतू याकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. दरम्यान यावेळी येथील शेतकऱ्यांची पोरं या संघटनेने पुढाकार घेतला असून त्यांनी या प्रश्नांबद्दल स्वाक्षरी मोहीम राबवत महामार्ग प्रशासनाला धारेवर धरले आहे. तत्काळ यासाठी उपाययोजना न केल्यास संघटनेकडून आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी अजिंक्य शिंदे, केतन ढवण, ऋषिकेश चव्हाण, किरण ढवण, चेतन मलंग, राहुल धर्मे,अमोल रंदिवे,अभिषेक जाधव, पांडुरंग रणखांब,रोहित बरदापुरे,समीर शेख,प्रतिक शिंदे,बालाजी लोखंडे, आदी शेतकरी पुत्र उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.