तीव्र लढा ,,,राज्य सरकारने बळीराजाच्या आर्त सादेला प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात – आ. राणाजगजितसिंह पाटील
प्रतिनिधी अलताफ शेख
उस्मानाबाद
पीक विम्यासाठी ४० हजारापेक्षा जास्त अर्ज; तुळजापूर तालुक्यात सर्व १०८ ग्रामपंचायतींचे ठराव..
उस्मानाबाद :- हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करत विविध मार्गाने आपण बळीराजाचा सन्मान करत असतो. मागील सहा महिन्यांपासून खरीप २०२० मधील हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी सरकारला आर्त साद घालत आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळाला असता तर या कृषी दिनी बळीराजाच्या हस्ते सरकारचाच सत्कार केला असता. मात्र दुर्दैवाने जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून आजही वंचित आहेत, ही बाब कृषी दिनी वेदना देणारी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ८०% शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा खरीप २०२० हंगामातील प्रलंबित पीक विमा अजूनही मिळाला नाही. सातत्याने पाठपुरावा करून देखील या विषयी विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत साधी बैठकही बोलविली जात नाही. त्यामुळे राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करत अनुदान दिले, परंतु विमा भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करून देखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. आता न्यायालयीन रणनीती म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रीतसर पोहच घ्यावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवावेत असे आवाहन आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना केले होते.
याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४० हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत कृषी सहाय्यकांकडे अर्ज केले आहेत व अनेक ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहेत. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील सर्वच १०८ ग्रामपंचायतींनी ठराव घेत शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाई देण्याचे आवाहन मा.मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे. तसेच जिल्ह्यातील उर्वरित ग्रामपंचायतींनी देखील ठराव घेण्याचे व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.