मुळ बिलावर व्याज आकारून ग्राहकांची फसवणूक
महावितरणने अधिकची रक्कम परत करावी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन
लातूर/प्रतिनिधी:वीजबिल थकीत नसतानाही महावितरणकडून मूळ बिलावर व्याज आकारणी केली जात आहे.ही बिले दुरुस्त करून द्यावीत तसेच आतापर्यंत ग्राहकाकडून घेतलेली जास्तीची रक्कम परत करावी,अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे यांच्या सुचनेवरून ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरातील अनेक भागात मिटर रिडींग न घेता वीजबिले दिली जातात.मीटर रिडींगची तारीख व बिलाची तारीख यात तफावत दिसते.ग्राहकाच्या समोर रीडिंग घेणे आवश्यक असताना रीडिंग घेणारा कर्मचारी ग्राहकांना रीडिंग घेतल्याचे कळवतही नाही.मीटर आणि बिलावर असणारी रीडिंग वेगळी दिसते.
एखाद्या ग्राहकाचे वीजबिल थकित असेल तर त्याला बिल भरण्याबाबत सुचना व न भरल्यास जोडणी तोडण्याची नोटीस देणे आवश्यक असते.पण अशी नोटीस न देता अनेकांच्या वीजजोडण्या तोडल्या जात आहेत.
घरगुती वापरासाठी १०० युनिटपेक्षा कमी रिडींग असेल तर ३ रुपये ४४ पैसे दर आकारला जातो.शंभरच्या पुढे मात्र दुपटीने दर आकारला जातो.अनेक ग्राहकांचे ७० ते ८०युनिट झालेले असताना त्याजागी ११०, १२० युनिटचे बिल दिले जाते.परिणामी ग्राहकांना दुपटीने पैसे भरावे लागतात.याच्यासोबतच बिलामध्ये व्याजही आकारले जाते.बिल थकीत असेल तर व्याज लावणे साहजिक आहे परंतु मूळ बिलावर व्याज आकारले जात आहे.यातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.महावितरणने ही सर्व बिले तातडीने दुरुस्त करून द्यावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.आज पर्यंत ग्राहकांकडून घेतलेली जास्तीची रक्कम परत करावी,अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दत्ता मिरकले, तालुकाध्यक्ष ॲड.संगमेश्वर रासुरे,तालुका संघटक धनराज जाधव व शहराध्यक्ष इस्माईल शेख,शारदा बेद्रे, मुन्ना हाश्मी,अहेमद हरणमारे, गोविंद राठोड,सुरेखा स्वामी
आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.