अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण
मनपाशी संपर्क साधण्याचे महापौरांचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी: पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरातील अंथरुणास खिळलेल्या, शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्तींना आता पालिकेच्या वतीने घरी जाऊन कोविड १९ लसीकरण केले जाणार आहे. यासाठी संबंधितांच्या नातेवाईकांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
अनेक व्यक्ती गंभीर आजार किंवा व्याधींमुळे हालचाल करू शकत नाहीत.त्यामुळे कोविड १९ लस घेण्यासाठी ते लसीकरण केंद्रापर्यंत येवू शकत नाहीत.अशा व्यक्ती आजवर लसीकरणापासून वंचित राहत होत्या. राज्यशासनाकडुन अंथरुणास खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणा-या व्यक्तींसाठी त्यांच्या घरी जावून कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करणेसंदर्भात मार्गदर्शक सुचना कळविण्यात आलेल्या आहेत. अशा रुग्णांना फक्त कोवॅक्सीन लस दिली जाणार आहे.
अशा नागरिकांना लसीकरणापूर्वी त्यांचे नियमित उपचार करणारे डॉक्टर किंवा फिजीशियन यांचे ती व्यक्ती अंथरुणाला खिळुन असल्याचे व पुढील ६ महिने याच अवस्थेत राहण्याची शक्यता असल्याबाबत वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. संबंधित व्यक्ती अथवा त्याची देखभाल करणाऱ्या घरातील व्यक्ती किंवा नातेवाईकाने कोविड १९ प्रतिबंधक लस घेण्याची ईच्छा असल्याबाबत व हरकत नसल्याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे.
या वैदयकीय प्रमाणपत्राची पुर्तता करून अंथरुणास खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या आणि लसीकरणासाठी इच्छुक व्यक्तीचे किंवा रुग्णाचे नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळुन असल्याचे कारण आदी माहिती लातूर शहर महानगरपालिकेच्या mclatur.covid19vaccination@ gmail.com या ई-मेल संकेतस्थळावर किंवा ९१५८६३२३३३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून महानगर पालिकेला द्यावी. अशा नागरीकांच्या लसीकरणाचे पुढील नियोजन करता येवू शकेल, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.