संसर्गजन्य रुग्णालयाच्या उभारणीस वेग
वैद्यकीय शिक्षण संचालकांनी केली जागेची पाहणी
लातूर/प्रतिनिधी:पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्राच्या वतीने संसर्गजन्य आजाराचे २०० खाटांचे रुग्णालय लातुरात विकसित करण्यात येत आहे. यातच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह देखील असणार आहे.
आज पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ॲड किरण जाधव, अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, डॉ.उदय मोहिते, यांच्यासह मान्यवरांनी जागेची पाहणी केली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, पुणे येथील नायडू विद्यालय यानंतर संसर्गजन्य आजारावर उपचारासाठी उभे राहणारे हे राज्यातील तिसरे रुग्णालय असणार आहे.
लातूर शहराच्या गावभागातील पटेल चौक येथे हे रुग्णालय विकसित केले जाणार आहे. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख या रुग्णालयासाठी आग्रही आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी ८७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या रुग्णालयासाठी महानगरपालिकेच्या वतीने पटेल चौकातील मनपा रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, डॉ.उदय मोहिते, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सोमवारी (दि.२ ऑगस्ट) प्रस्तावित जागेची पाहणी केली असता नियोजित रुग्नालयासाठी जागा अतिशय योग्य असून वैद्यकीय शिक्षण विभागाकडून लवकरात लवकर प्रकल्प उभारणीस प्रारंभ करण्यात येईल असे मत डॉ दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव, मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर,डॉ.प्रशांत माले, गोरोबा लोखंडे यांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून अशा पद्धतीचे राज्यातील केवळ तिसरे रुग्णालय लातुरात उभे राहणार आहे.यापूर्वी मुंबईत कस्तुरबा रुग्णालय व पुणे येथे नायडू रुग्णालय अशी दोनच रुग्णालये संसर्गजन्य आजारावर उपचारासाठी कार्यरत आहेत.लातुरात रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईच्या तोडीचे उपचार लातूर शहरात उपलब्ध होणार आहेत.लातूर शहर व जिल्ह्यासह मराठवाड्यातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.