शहराच्या विकासात निधीची कमतरता भासू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.

 शहराच्या विकासात निधीची कमतरता भासू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.. 


>>>औशाचा शहराचा इतिहास समृद्ध, गौरवशाली आहे तसेच ऐतिहासिक वारसा जतन करा.. 






एस ए काझी 


औसा/ प्रतिनिधी : - औसा शहरातील विविध विकासकामांचं नुकतंच उद्धाटन करण्यात आलं. यानिमित्त आज लातूर जिल्ह्यातील औसा शहरवासियांशी ऑनलाईन संवाद साधला. औसा नगरपरिषदेला शहराच्या विकासात निधीची कमतरता भासू देणार नाही,याची खात्री दिली. शहरवासियांसाठी विकासकामांचा डोंगर उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. औसा शहराचा इतिहास समृद्ध, गौरवशाली आहेच; परंतु औसाचे भविष्य अधिक उज्ज्वल, समृद्ध आणि गौरवशाली करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री  म्हणून औसावासियांच्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथ, माझं सहकार्य असेल. गेल्या नऊ तारखेला ऑगस्ट क्रांतिदिनी औसा-माकणी पाईपलाईन पाणीपुरवठा योजनेचं लोकार्पण, शिवकालीन मराठा भवनाचं लोकार्पण,  सांस्कृतिक सभागृहाचं नुतनीकरण, किल्ला वेस ते जलालशाही चौक रस्ता-कामाचं उद्घाटन इत्यादी अनेक विकासकामांचं उद्घाटन आपण केलं. यातून औसा शहराच्या विकासाला एक चांगली दिशा, गती मिळाली आहे. यातून जिल्हावासियांना, राज्यातल्या जनतेला एक चांगला संदेश देण्याचं काम आपण केलं आहे. औसा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. इथे अनेक ऐतिहासिक इमारती, भूईकोट किल्ला, ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांचं जतन झालं पाहिजे. पर्यटन वाढीला चालना दिली पाहिजे. यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. औसा शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण औसा-माकणी पाणीपुरवठा पाईप लाईन योजना मार्गी लावली. माकणी-निम्न तेरणा प्रकल्प मार्गी लागला आहे. तब्बल ३७ किलोमीटर अंतरावरुन औसा फिल्टर स्थळापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली आहे. औसा नगरपरिषदेनं स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनावर येणाऱ्या काळात अधिक काम करावं, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराचं नियोजन करावं, पाण्याचा काळजीपूर्वक वापर, पुनर्वापर याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, अशा सूचना केल्या. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी नियमित कर भरला पाहिजे. औसा नगरपरिषदेनं औसा शहर स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे. गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. यापुढच्या काळात देखील आपण अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी औसा नगरपरिषदेनं संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन सर्व उपाययोजना राबवाव्यात, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं. सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असं आवाहन आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या