सार्वजनिक बौद्ध विहाराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी
निधी कमी पडू दिला जाणार नाही
-पालकमंत्री अमित देशमुख
बौद्धनगर येथील वैशाली सार्वजनिक बौद्ध विहाराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा
पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरीकांनी सतर्कता बाळगावी
जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणासाठी नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा
लातूर प्रतिनिधी (सोमवार दि. २ ऑगस्ट २१)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वैशाली सार्वजनिक बौद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 53 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हे बौद्ध विहार तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे या बौद्ध विहाराच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
लातूर शहरातील बौद्ध नगर भागातील वैशाली सार्वजनिक विहाराच्या सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, संसदीय कार्य, पाणी पुरवठा व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, बौद्ध भिक्षू भैय्यानंद, पूज्य यश कश्यपन, सार्वजनिक बौद्ध विहारचे अध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो, सचिव केशव कांबळे, समाज कल्याण चे उपायुक्त दिलीप राठोड, सहायक आयुक्त शिवकांत चिकूर्ते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, बौद्ध विहाराचे या परिसरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे ठिकाण म्हणजे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पवित्र ठिकाण असून या ठिकाणाच्या सुशोभिकरणाच्या कामाच्या आराखडा तयार करण्यात आला असून ही वास्तू अत्यंत सुंदर बनवली जाणार आहे. बौद्ध धर्म कार्यासाठी आणखी काय करता येईल यासाठी आघाडी शासन बांधील असून मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक होणार असून पुढील पाच वर्षात त्या वास्तूचा दिमाखदार व जागतिक दर्जाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना लातूरसह राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे निर्माण करण्यात आली. आजच्या या कोरोनाच्या महामारीत या वास्तू आरोग्य सुविधा साठी वापरण्यात आली. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर सोय झाली ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे व संभाव्य तिसरी लाट ही येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी कोरोना च्या प्रतिबंधासाठी योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे असून यामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभाग घ्यावा. शासन-प्रशासन कोरोना ची लाट थोपविण्यासाठी सज्ज असून यामध्ये नागरिकांनीही मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.
वैशाली सार्वजनिक बौद्ध विहार हे वैचारिक व सांस्कृतिक चळवळीचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र असून या केंद्राच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच हे बौद्ध विहार मराठवाड्यातील सर्वात मोठे बौद्ध विहार म्हणून विकसित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली. तसेच या विहाराच्या सुशोभीकरणाचा हा दिमाखदार सोहळा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या वास्तूचे सुशोभीकरण करण्याचे काम विहित वेळेत व अत्यंत गुणात्मकरित्या पूर्ण होईल यासाठी संबंधित विभाग योग्य ती दक्षता घेईल ,अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे व अन्य मान्यवर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
समाज कल्याण चे प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड यांनी प्रास्ताविक केले या मध्ये या बौद्ध विहार सुशोभीकरण कामासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 52 लाख 69 हजार आचा निधी मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये 47 लाख 42 हजार म्हणजेच 90 टक्के निधी सामाजिक न्याय विभाग देणार असून उर्वरित दहा टक्के निधी म्हणजे 5 लाख 26 हजार रुपये वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार संस्था देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
वैशाली सार्वजनिक बौद्धविहार ही वास्तू लोकवर्गणीतून निर्माण केली होती. या वास्तूची डागडुजी करण्याची गरज होती परंतु त्या कामासाठी संस्थेकडे निधी उपलब्ध नव्हता त्यामुळे सामाजिक न्याय विभागांतर्गत योजनेतून या कामासाठी 90 टक्के निधी उपलब्ध झाला असून उर्वरित 10 टक्के निधी संस्था देणार असून लवकरच ही वास्तू वापरण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती केशव कांबळे यांनी आपल्या मनोगतात दिली.
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर वैशाली सार्वजनिक बौद्ध विहार सुशोभीकरण कामाच्या कोनशिलाचे अनावरण पालकमंत्री देशमुख व राज्यमंत्री बनसोडे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.