सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध
-- पालकमंत्री अमित देशमुख
लातूर, दि.11( जिमाका ):- कोविड-19 ने जगभरात थैमान घातलेले आहे. कोविडची दुसरी लाट ओसरत असून संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविडच्या या लाटेत राज्य शासनामार्फत चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासन प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहे. या कालावधीत नागरिकांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.उदगीर सामान्य रुग्णालयात आयोजित ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले की, कोरोना (कोविड-19) ने आरोग्य व्यवस्थेसह आरोग्य सेवा का महत्वाची आहे, हे आपल्याला शिकवलं आहे. आरोग्य सुविधा व वैद्यकीय सेवेत अमुलाग्र बदल झाला पाहीजे व ती महत्वाची आहे. सर्व सामान्यांचा जीव कोरोनामुळे बळी पडणार नाही याची पुर्णपणे दक्षता घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क,सॅनीटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब नियमीतपणे करावा. तसेच आपली प्रतिकार शक्ती उत्तम ठेवावी, असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हयातील प्रत्येक तालुका- तालुक्याला जोडणारे महत्वाचे रस्ते बारमाही खड्डेमुक्त असले पाहीजेत व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिले, त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, याचीही ग्वाहीही त्यांनी दिली.
विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याचाही प्रयत्न करावा त्याबाबतचा मोबदलाही शेतकऱ्यांना मिळवून दयावा, अशा सुचना श्री. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाला राज्य शासनामार्फत पाठविण्यात आलेला आहे व त्याचा पाठपुरावाही सुरु आहे. सांस्कृतिक विभागामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारीत चित्रफितही तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
उदगीर येथील सामान्य रुग्णालय येथे कोविड निदान प्रयोगशाळा (RTPCR LAB) ऑक्सिजन निर्मिती लोकार्पण सोहळा शिवाजी महाविद्यालयात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, बस्वराज नागराळकर, माजी नगरसेवक राजेश्वर निटुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय चिंचोळकर, लातूर परिमंडळाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.व्ही. पवार, डॉ. शशिकांत देशपांडे, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, व उदगीर येथील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
राज्यमंत्री संजय बनसोडे अध्यक्ष स्थानावरुन बोलताना म्हणाले की, कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागत आहे. तपासणीसाठी लागणारा वेळ, उपचार व एकाच वेळी औषधांचा तुटवडा या मुख्य गोष्टींचाही शासनाला सामना करावा लागला. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्री अमित देशमुख यांनी मागील काही बैठकीच्या अनुषंगाने आरटीपीसीआर लॅब (RTPCR LAB) उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयांसाठी मंजूर करणार असल्याबाबतची ग्वाही दिली होती. ती आज पालकमंत्री अमित देशमुख यांनी आरटीपीसीआरच्या माध्यमातून पूर्ण केली. त्यामुळे आपल्याला आता लातूर, सोलापूर, पुणे येथे आरटीपीसीआरच्या चाचणीसाठी जाण्याची गरज नाही. आता ती आपल्या शहरात सुविधा उपलब्ध् झाली आहे. मराठवाडयातील पहिली लॅब उदगीर येथील आहे. आरोग्याच्या दृष्टीने काम करीत असताना कोरोनाच्या कालावधीतसुध्दा आपण शासनामार्फत अनेक योजनांची अंमलबजावणीही पारदर्शकपणे केली आहे, असेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले की, मराठवाडयातील उदगीर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयातील पहिली आरटीपीसीआर लॅब सुरु झाली आहे. ही एक आपल्यासाठी अभिमानाची व महत्वाची बाब आहे. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभाव्यता संशोधक व्यक्त करत आहेत. ही लाट आपण सौम्य करु शकणार आहोत, त्यासाठी आपण सर्वांनी मास्क,सॅनीटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब नियमीतपणे करावा. तसेच आपणास कोणतेही लक्षणे दिसून आली तर तात्काळ तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन उपचार करणे सोईचे होईल. तसेच लातूर येथील कोरोना तपासणीसाठी लागणारा वेळ या लॅबमुळे वाचणार आहे. या लॅबमध्ये वेळ आली तर तीन शिफ्टमध्ये 1 हजार 500 तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजन निर्मितीही दर मिनिटाला 500 लिटर करता येणे शक्य आहे. यात 15 मॅट्रिक टनचा ऑक्सिजन टॅक आहे. या रुग्णालयात उपचार पध्दतीही उत्तम प्रकारची आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी महत्वाची कामगिरी केली आहे. भविष्यात आरोग्य सेवा जास्तीत जास्त उत्तम देवू , असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हयात 16 सर्कलमध्ये 65 टक्के पर्जन्यमान झाले आहे. यात ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, त्यांनी 72 तासाच्या आत ऑनलाईन, ऑफलाईन, पध्दतीने अर्ज सादर करावेत. तसेच तालुका कृषि अधिकारी, तलाठी किंवा विमा कंपनीचे प्रतिनिधीशी संपर्क साधावा. तसेच विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी याप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या कालावधीत उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच सलात अल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उदगीर यांनी रोटी, कपडा, बँक या माध्यमातून कोरोना काळात कोरोनाच्या कालावधीत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय गुडसूरकर यांनी केले तर आभार उदगीर समान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.व्ही.पवार यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.