लातूर जिल्ह्याची ऐतिहासिक सफर...!!
( भाग - 2 )
लत्तलूर ते लातूर...!!
भारतीय द्विपकल्पात लातूरचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्वाचे होते. पुरश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रपाषाणयुग यांच्या नंतर येणाऱ्या काळा पर्यंत येथे प्राथमिक अवस्थेतील मानवी वसाहती होत्या... याचे पुरावे लातूर - आंबाजोगाई मार्गावरील हरवाडी या गावाजवळ सुमारे 50 हजार वर्षापूर्वीच्या हत्ती, पानघोडे इत्यादी प्राण्यांची हाडे सापडली असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात जलस्रोत होता. म्हणजे आज मांजरा नदीच्या खोऱ्यात जो सहासे ते सातशे मिली मीटर एवढा सरासरी पाऊस पडतो.. तो त्याकाळी अधिक मोठ्या प्रमाणात पडत असावा. हे सांगण्या मागचा उद्देश एवढाच की मानवी वस्तीसाठी लागणारी अनुकूलता या प्रदेशात होती. त्यामुळे अश्मयुगात येथे माणसाचा वावर सुरु झाला असावा.( संदर्भ डॉ. हरिहर ठोसर यांचे लेखन )
मागच्या लेखात मी राष्ट्रकुट राजवंशाचे मूळगाव लत्तलूर असल्याचे ओझरते सांगितले होते. पण त्यापूर्वी लातूर भागाचे अस्तित्व काय होते. ते बघूया...!!
ऐतिहासिक काळाच्या पूर्वीचा काळ जर बघितला तर भारतात गण व्यवस्था होती.. त्या गणाचे सम्राज्यात रूपांतर करण्याचे काम चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात झाले... मौर्य घराण्याच्या काळात 16 महाजनपदे निर्माण केली होती. त्यातली दोन महापदे अश्मक आणि मूलक ही दक्षिण भारतातील होती.. अश्मकची राजधानी पोदनपूर ( आजचे बोधन जिल्हा निजामाबाद ) आणि मूलकची राजधानी प्रतिष्ठान नगर ( आजचे पैठण )... यातले बोधन लातूर पासून 172 किलो मीटर अंतरावर आहे.. लातूर मांजरा नदीच्या कडेवर आणि बोधनही मांजरा नदीच्या किनारी वसलेली शहर तर मौर्य काळात दक्षिणेच्या दोन समृद्ध बाजार पेठा एक प्रतिष्ठान नगर ( पैठण ) आणि दुसरे तगर ( तेर )... त्यातले तेर लातूर पासून अवघ्या 50 किलोमीटरवर होते.
इ. स. पूर्व चौथ्या शतकात मौर्याचा दक्षिणेत अजून राज्य विस्तार झाला.. त्यावेळी प्रशासनाच्या सोयीसाठी मौर्याचे दक्षिणेतील मुख्यालय सुवर्णंगिरी म्हणजे गुलाबर्गा जिल्ह्यातील आजचे सन्नती. सन्नती ते तेर हे आंतर 350 किलोमीटर आहे,हा एकेकाळचा व्यापारी मार्ग होता, मधला पडाव लातूर ... या सगळ्यात लातूरचे महत्व अधोरेखित होते. हे सगळे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की राष्ट्रकुटाच्या पूर्वीही लातूरचे अस्तित्व होते. पुढे कुंतल प्रदेश झाला, त्यात लातूरचा समावेश होऊ लागला.
सातवाहन कालखंड
सातवाहन सिमूख हा मोर्य सम्राज्याचा दक्षिणेकडील मांडलीक होता... पण पहिल्या शतकात सातवाहनाचे स्वातंत्र्य राज्य निर्माण झाले. प्रतिष्ठान नगर ( पैठण ) राजधानीचे ठिकाण होते. त्या काळात उज्जैन सारख्या उत्तरेतील व्यापारपेठेला जोडणारी गाव म्हणजे भडोच,भोकरदन, तेर. तेरचा उल्लेख ग्रीक प्राचीन साहित्यात आढळतो. विशेष म्हणजे तगर जनपदचा उल्लेख असलेल्या नाण्यावरून लत्तलूर हे तगर ( तेर ) जनपदाचा एक भाग होता हे दिसून येते.
वाकाटक कालखंड
वाकटक या घराण्यातील प्रवरसेन या महापराक्रमी राजाने संपूर्ण दक्षिणापथ आपल्या अधिपत्याखाली घेतले होते. वाकाटक राजघराण्याच्या दोन शाखेतील एक शाखा वत्सगुल्म आजचे वाशिम येथे होती. त्या शाखेच्या अधिपत्याखाली आजचा पश्चिम विदर्भ,मराठवाडा काही प्रमाणात आंध्र प्रदेश आणि काही कर्नाटक आजचा सीमावर्ती भाग असा राज्यविस्तार होता. देवसेन वाकाटक राजाच्या " इंडिया ताम्रपट " यातील वर्णनानुसार लातूर हा भाग होता आणि तो " नांगरकटक - उत्तरमार्ग " च्या प्रशासन विभागात मोडत होता. वाकाटकाच्या वत्सगुल्म शाखेला आपातकालात खरा राजाश्रय लातूर - उस्मानाबाद - बिदर भागाने दिल्याचे ताम्रपटावरून सिद्ध होत असल्याचे नोंदविण्यात आले आहे. ( संदर्भ पुस्तक :- अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, अर्ली ब्राम्ही इन्स्क्रिप्शन फॉर्म सन्नती )
वाकटक देवसेनच्या बिदर ताम्रपटातील स्थलनामाची निश्चिती औसा आणि लातूर म्हणून होते. वेल्पकोंडा म्हणजे बेलकुंड, पसापलकल्ल म्हणजे हसाळा, क्रेरिंचकल्ल म्हणजे केज आणि डोणिथोंब म्हणजे धानोरी यावरून देवसेनच्या ताब्यात होता हे सिद्ध होते. याशिवाय तेर येथे विद्याधरवंशीय राजे राज्य करत असल्याचाही उल्लेख आढळतो.
लातूर आणि उस्मानाबाद मधील अनेक गावामध्ये या प्राचीन इतिहासाचे अवशेष जमिनीच्याखाली निद्रिस्त आहेत.. यावर संशोधन करण्याची गरज असून जिथे जिथे प्राचीन अवशेष आहेत त्यावर प्रकाश टाकण्याची गरज आहे.
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.