जिल्ह्यातील नागरिकांनी जमिन खरेदी विक्री व्यवहार करतांना संकेस्थळावर जाऊन आदेशाची पडताळणी करुन घ्यावी --- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

 जिल्ह्यातील नागरिकांनी जमिन खरेदी विक्री व्यवहार करतांना 

संकेस्थळावर जाऊन आदेशाची पडताळणी करुन घ्यावी

                                         --- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन






           लातूर दि.28(जिमाका) :- महाराष्ट्र जीवन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 व कलम 44 अन्वये जमीनीच्या वापराचे एका प्रयोजनातुन दुसऱ्या प्रयोजनात रुपांतर करण्याबाबत कार्यपध्दती नमुद आहे. त्यानुसार लातूर जिल्हयात तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडून अकृषिक आदेश पारीत केले जातात. सदर आदेशात खडाखोड करुन चुकीच्या पध्दतीने यापूर्वी वापर केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली असून जमिनीचे व्यवहार करताना laturnaorders.in या संकेत स्थळावर जावून खात्री करुनच व्यवहार करावेत असे आवाहन जिल्हयातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


            तसेच अकृषिक आदेश पारीत केल्यानंतर सदर आदेशांची नोंद घेण्याबाबत कार्यपध्दती नमुद आहे. त्यानुसार ले-आऊट मधील रस्ते व खुली जागा नियोजन प्राधिकणास हस्तांतरीत करण्याबाबतची तरतुद आहे. त्यानुसार अधिकार अभिलेखात नोंद न घेतल्यास अशा जागा विक्री होण्याचा किंवा त्यावर अतिक्रमण होण्याचा संभव असतो. त्यातुन सामान्य जनतेची फसवणुक होऊन शहराचे विद्रुपीकरण होऊन शाश्वत विकासाला अडथळा निर्माण होतो. 


            लातूर जिल्ह्यातील जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या (laturnaorders.in) या संकेतस्थळावर या कर्यालायामार्फत देण्यात आलेले सर्व अकृषिक आदेश अपलोड करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. 


             पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी , लातूर, सर्व उपविभागीय अधिकारी जि. लातूर व सर्व तहसिलदार लातूर यांच्याकडील सन-2011 पासून-2021 पर्यंतचे अकृषिक आदेश व ले-आऊट अपलोड करण्यात येत आहेत. आज अखेर 762 अकृषिक आदेश अपलोड करण्यात आले आहेत. उर्वरित अकृषिक आदेश अपलोड करण्याचे कामकाज संबंधित कार्यालयाकडून सुरु आहे. 


             लातूर जिल्हयातील नागरिकांनी laturnaorders.in  या संकेतस्थळावर जाऊन जमिन खरेंदी- विक्री व्यवहार करताना सदर आदेशाची पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.


                                                      ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या