जिल्ह्यात बनणारे रस्ते युवकांचे भवितव्य घडविणारे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 


जिल्ह्यात बनणारे रस्ते युवकांचे भवितव्य घडविणारे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी






 लातूर/प्रतिनिधी: कुठलाही रस्ता हा गावे नाही तर माणसाची मने जोडण्याचे काम करत असतो.लातूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने महामार्गांची कामे सुरू आहेत. नव्याने बनणारे हे रस्ते युवकांचे भवितव्य घडविणारे ठरतील.असंख्य युवकांना नवे रोजगार देतील. जिल्ह्यात उद्योगधंदे येण्यासह शेतीही या रस्त्यांमुळे समृद्ध होईल,असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.
  जिल्ह्यातील १९ महामार्गांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात गडकरी बोलत होते.या कार्यक्रमास खा. सुधाकरराव शृंगारे
,राज्यमंत्री संजय बनसोडे,माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड,आ.अभिमन्यू पवार, आ.बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे,माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ. गोपाळराव पाटील, सुनील गायकवाड,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,गोविंद केंद्रे,सुधाकर भालेराव,विनायकराव पाटील, बब्रुवाहन खंदाडे , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर,संजय दोरवे, गणेश हाके,गुरुनाथ मगे,शैलेश लाहोटी, दीपक मठपती,अजित पाटील कव्हेकर यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


  यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की,रस्त्या शिवाय विकास अशक्य आहे. त्यामुळेच रस्ते चांगले करण्यावर प्रारंभापासून भर देण्यात आलेला आहे .मागच्या काही वर्षात देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली.महाराष्ट्रातही मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या संख्येने रस्त्यांची कामे झाली.मी मंत्री झालो तेव्हा लातूर जिल्ह्यात अवघे १२४ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते.ते आता ५८७ किलोमीटर झाले आहेत.महामार्गांच्या संख्येत ३३८ टक्‍क्‍यांची वाढ झाली असून ५ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.आणखीही ३ ते ४  हजार कोटी रुपयांची कामे लातूर जिल्ह्यात केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
  सूरतहून नाशिक-नगर -सोलापूर -विजापूर मार्गे दक्षिण भारताला जोडणारा ४० हजार कोटी रुपयांचा एक नवा महामार्ग तयार केला जाणार आहे.या मार्गाला मराठवाडा आणि विशेषतः लातूर जिल्ह्याला जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


   लातूर येथे ब्रॉडगेज रेल्वे आहे.त्याचा वापर करून ब्रॉडगेज मेट्रो सुरू केली तर त्यास मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.ब्रॉडगेज मेट्रोमुळे वेळ आणि पैसाही वाचेल. मराठवाड्यात ही मेट्रो सुरू झाली तर विकासाला गती मिळेल,असेही त्यांनी सांगितले.
   लातूर ही शिक्षणाची राजधानी आहे.आता शिक्षणासोबतच उद्योग व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लातूर पुढे येत आहे.सर्वात जलद गतीने विकसित होणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख निर्माण होईल,असेही गडकरी यांनी सांगितले.
  लातूर येथे रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला याचे शल्य आजही मनाला बोचते. त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रीय महामार्गांची कामे करताना नदी व नाले यांसह तलावांचे खोलीकरण करावे. यातून पाणीसाठा वाढेल आणि पाणीटंचाई कायमची दूर होईल. लोकप्रतिनिधींनी याला प्राधान्य द्यावे,असेही गडकरी म्हणाले.


  तत्पूर्वी मनोगत व्यक्त करताना माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की,अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना मान्य असणारे नेतृत्व म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे .लातूर ही ज्ञानाची खाण असल्यामुळे पुढच्या पिढीसाठी लातूरला केंद्रीय विद्यापीठ मंजूर करावे.लातूर ते टेंभुर्णी हा चारपदरी महामार्ग मंजूर करावा. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूने जाणारा नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक हा वळणरस्ता मंजूर करावा.देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग मंजूर करावेत. शिरूर ताजबंद ते उदगीर हा रस्ता आणि उदगीरचा वळणरस्ता मंजूर करावा,आदी मागण्या त्यांनी केल्या.
  स्वातंत्र्यानंतर गडकरी यांच्याकडूनच मराठवाड्याला सर्वाधिक निधी मिळाला. गडकरी यांच्यासारखा नेता नाही हे विरोधकांनाही मान्य असल्याचेही आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले.
   खा.सुधाकरराव शृंगारे यांनी नदीजोड प्रकल्प राबविण्याची मागणी केली .संजय बनसोडे यांनीही आपल्या मनोगतात विविध मागण्या सादर केल्या.


   प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा भाजपाच्या वतीनेही गडकरी यांना सन्मानित करण्यात आले.गडकरी यांच्या हस्ते १०२३  कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे ई भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
  या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 

लातूर - टेंभुर्णी मार्गास मंजुरी ...
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतात लातूरहून पुण्याला जोडणारा लातूर ते टेंभुर्णी रस्ता चार पदरी करण्याची मागणी केली होती.हा रस्ता मंजूर करण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
मी केवळ घोषणा करत नाही तर पूर्ण होणारी आश्वासने देतो.सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो,असे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.सिद्धेश्वर मंदिर लगतचा नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक जाणारा वळण रस्ताही करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात गडकरी यांच्या घोषणांचे स्वागत केले 
   आ.निलंगेकर यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक....
 केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या भाषणात आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले.आ.X संभाजीराव पाटील आजारी आहेत.त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका,असा निरोप मी त्यांना पाठवला होता.तरीदेखील ते कार्यक्रमास उपस्थित राहिले. विकासकामांबाबतची त्यांची तळमळ मी समजू शकतो असेही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या