जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी


 

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

















लातूर, दि.16 (जिमाका):- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे  यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते दि. 30 नोव्हेंबर 2021  रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.     

या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.


वृत्त क्र.1029                                                                                     दिनांक:- 16 नोव्हेंबर, 2021

 

खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी प्रवेश चाचण्यांचे

22 व 23 नोव्हेंबर रोजी आयोजन

 

लातूर, दि.16 (जिमाका):- खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर विविध कौशल्य चाचण्यांच्या आधारे १२ वर्षाखालील १५ मुले व १५ मुलींना प्रवेश देण्यात येणार असून त्यांच्या निवडीसाठी दि. २२ व २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशिय हॉल मधील कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर निवड चाचण्यांचे आयोजन केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध खेळांची प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. लातूर जिल्ह्यासाठी कुस्ती या खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर केले असून जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

 या केंद्रावर १२ वर्षाखालील वयोगटातील मर्यादीत ३० मुले व मुलींसाठी प्रवेश देण्याचे निश्चित केलेले आहे. कुस्ती प्रशिक्षण केंद्रावर तज्ञ व जुन्या अनुभवी खेळाडू क्रीडा मार्गदर्शकांमार्फत दैनंदिन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्रावर प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थींना शासनाच्या वतिने खेळाडू गणवेश, अद्ययावत क्रीडा साहित्य, स्पर्धेतील सहभागाचा खर्च इ. सुविधा देण्यात येणार आहेत.

          या चाचण्यांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा तसेच अधिक माहितीसाठी राज्य कुस्ती क्रीडा मार्गदर्शक सुरेंद्र कराड यांचेशी मोबाईल क्रमांक ७९७२३९७१३० वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

                                           

वृत्त क्र.1030                                                                                       दिनांक:- 16 नोव्हेंबर, 2021

 

सोयाबीन विविध वाणाचा मोठया प्रमाणात बिजोत्पादन 

कार्यक्रम  आरक्षण करुन घेण्याचे आवाहन

 

        लातूर, दि.16 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा कडून दरवर्षी राज्यातील बिजोत्पादकांमार्फत विविध पीक वाणांचा प्रमाणित/पायाभुत  बिजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अनुषंगाने खरीप 2022 हंगामाची सोयाबीन बियाण्याची राज्याची पुर्तता करण्याचे दृष्टीने महामंडळाने उन्हाळी 2021-22 हंगामामध्ये MASU-612,MASU-158, MASU-162, MASU-71,फुले संगम (KDS-726),फुले किमया, या  वाणाचा प्रमाणित/पायाभुत दर्जाचा बिजोत्पादन कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचे ठरविलेले आहे.

         महामंडळास नियोजित बिजोत्पादन कार्यक्रम हा 15 जानेवारी 2022 पुर्वी राबवायचा असून इच्छुक बिजोत्पादकांनी या बिजोत्पादन कार्यक्रम संबंधीत स्त्रोत बियाणे ,स्त्रोत बियाणे किंमत ,उन्हाळी 2021.22 हंगामातील महामंडळाचे सोयाबीन बिजोत्पादनाचे खरेदी धोरण इ. विषयी माहिती संबंधीत जिल्हयाचे महाबीज जिल्हा कार्यालयाकडून उपलब्ध करून घेवून बिजोत्पादन कार्यक्रमाचे आरक्षण करण्यासाठी ७/१२,आधारकार्ड,बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत देऊन आपले आरक्षण करून घेण्यात यावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाबीज लातूर यांनी केले आहे.                                                        

          संपर्कासाठी पूढील प्रमाणे सहायक क्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. जिल्हा व्यवस्थापक, महाबीज लातूर मोबाईल क्रं-8669642739, सहायक क्षेत्र अधिकारी लातुर/ रेणापुर मोबाईल क्रं- 9850856230, सहायक क्षेत्र अधिकारी औसा/ निलंगा/ देवणी/ जळकोट मोबाईल क्रं—8978047777, सहायक क्षेत्र अधिकारी चाकुर/ शिरूर अंनतपाल मोबाईल क्रं- 8623916725 व सहायक क्षेत्र अधिकारी अहमदपुर/ उदगीर/ जळकोट मोबाईल क्रं-9850026718 आहे.

                                               

वृत्त क्र.1031                                                                                    दिनांक:- 16 नोव्हेंबर, 2021

 

राष्ट्रीय युवा पुरस्कार 2019-20 साठी 19 नोव्हेंबर

पुर्वी अर्ज करण्याचे आवाहन

 

       लातूर, दि.16 (जिमाका):- युवा विकासाचे कार्य, आरोग्य क्षेत्रातील नवीन उपक्रम व संशोधन, संस्कृती, मानवी हक्कांबाबत कार्य, कला व साहित्य, पर्यटन, पारंपारिक औषधे, सक्रीय नागरीकत्व, सामाजीक सेवा, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील श्रेष्ठता व अद्यावत शिक्षण इ. क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या युवकांना केंद्र शासनाच्या वतिने राष्ट्रीय  युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

          सन 2019-20 या वर्षाच्या पुरस्कारासाठी पात्र युवक व युवतींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतींनी केंद्र शासनाच्या https://innovate.mygov.in/national-youth-award-2020 या लिंकवरुन दि. 19 नोव्हेंबर, 2021 पुर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

      ऑनलाईन अर्ज करणाऱ्या युवक व युवतींनी ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावांच्या दोन प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयात सादर कराव्यात म्हणजे त्यांचे अर्ज राज्यस्तर समितीच्या शिफारशीसह केंद्र शासनास सादर करणे सोयईचे होईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                                            ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या