विधानसभा उमेदवाराचं क्राइम रेकॉर्ड असेल तर? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;पहा…
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद÷ मुंबई,,राजकारणातील गुन्हेगारीकरणाला दणका देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षाची उमेदवारी दिल्यास त्यामागचे कारणही जनतेला सांगावे लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. जर एखाद्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली किंवा या व्यक्तीला उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले तर त्यांना थेट जनतेसमोर हाच उमेदवार का निवडला, हे सांगावे लागणार आहे.निवडणुकीत आपण ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे त्याच्याबाबत मतदारांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी अर्थातच संबंधित राजकीय पक्षाची राहणार आहे. एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, त्याच्यावर काही गुन्हे दाखल असतील तर त्याचा तपशील वर्तमानपत्र, टीव्ही, वेबसाइट अशा माध्यमातून जाहीर करावा लागेल.
त्याचवेळी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला उमेदवारी न देता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाच का उमेदवारी दिली, हे सुद्धा संबंधित राजकीय पक्षांना स्पष्ट करावे लागेल, असे सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे. गोवा विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे उच्चस्तरिय पथक तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहे. येथे निवडणुकीच्या तयारीचा या पथकाने आढावा घेतला. त्यानंतर याबाबतची माहिती चंद्रा यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.दरम्यान गोवा निवडणूकीत निष्पक्ष प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली असून गोव्याच्या सर्व एंट्री पॉइंट्सवर तसेच किनारपट्टी भागावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश बँकांना दिले गेले आहेत. याशिवाय इतरबाबतही यंत्रणा सज्ज होत आहे, असे चंद्रा यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.