नांदगाव येथील बोगस मतदारांचे नावे तात्काळ रद्द करा
... अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
... अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
लातूर : तालुक्यातील नांदगाव येथील यादी भाग क्रमांक 4 व 5 मध्ये निवडणूक विभागामार्फत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात सुमारे 192 बोगस मतदाराची नोंद करण्यात आली असून यातील बोगस मतदाराचे नावे तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रोहित सुधाकर पाटील यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे दिला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की नुकताच निवडणूक विभागामार्फत नाव समाविष्ट करण्यात यावे, नावे दुरुस्ती करणे, नावे स्थलांतरीत, वगळणे इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आला होता. मात्र गावातील काही अज्ञात व्यक्तींनी आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पुढील हेतू साध्य करण्याच्या निमित्ताने संबंधित बीएलओ यांच्याशी हातमिळवणी करत बनावट कागदपत्रे जोडाजोडी करून आपल्या मर्जीतील मित्र, नातेवाईक यांच्यासह एकूण 192 बोगस मतदार यांची नोंदणी केली आहे. यांच्या सर्वांच्या विरोधात पुराव्यासह पाटील यांनी लेखी अर्ज दाखल केला आहे. खरं तर बीएलओ निवडणूक विभागाचा महत्वपूर्ण घटक असताना त्यांनी यादी झोपेत बनवली का? असा प्रश्न निर्माण होत असून त्यांची चौकशी केली जावी अशी सुजाण मतदार यांच्यातून मागणी होत आहे.
जिल्ह्यात आता अवघ्या काही दिवसावर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समिती, व हजारो ग्राम पंचायतीच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना एका गावातून तब्बल दोनशेच्या जवळ बोगस मतदान उघडकीस आल्याने अनेक बीएलओचे धाबे दणाणले आहेत. अशा घटनेने नांदगाव येथील मूळ रहिवाशी लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला असून, याबाबत तात्काळ या विषयाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
यावेळी अतुल पाटील, चेअरमन सतीश कुलकर्णी, माजी उपसरपंच आंनद पाटील, माजी सरपंच महादेव बनसोडे, प्रदीप कोटीवाले, रोहित पाटील, कैलास जगताप, शरीफ शेख, अजिंक्य पाटील, सुधाकर पाटील, शिदाजी जगताप, व्यंकट घोडके, वामन कळबंडे, कैलास साळुंके, अक्षय पाटील, धीरज पाटील, बापूराव पाटील, सुरेश पाटील, सुधाकर ढमाले, वसंत ढमाले, श्रीपाल वाघमारे, बालाजी कळबंडे, रणजित पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.