खासगी शिकवण्या ऑफलाईन सुरु करण्यास परवानगी द्यावी मराठवाडा पालक संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी

 




खासगी शिकवण्या ऑफलाईन सुरु करण्यास परवानगी द्यावी
मराठवाडा पालक संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी






लातूर : खासगी शिकवणी वर्ग सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे आकलन होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खासगी शिकवणी वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी मराठवाडा पालक संघाच्यावतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोनामुळे शासनाने निर्बंध लादले. त्यातच अगोदरच व्यवसाय व रोजगार बंद व ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांशी पालकांना आपल्या पाल्यांना अँड्रॉईड मोबाईल विकत घेऊन देण्यासाठी उसनवारी करावी लागली. पालकांनी कसे तरी करून पाल्यांसाठी अँड्रॉईड मोबाईलची सोय करून दिली. मात्र, बहुतांशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे आकलन झाले नाही. काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला बगल देऊन मोबाईलवरील खेळांकडे वळले. दरम्यान, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरु केले. परंतु, गेल्या १० जानेवारीपासून कोरोनाच्या नावाखाली खासगी शिकवण्या बंद करुन ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पूर्वीप्रमाणेच शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय, लातुरात कोरोना रुग्णसंख्याही कमी होत आहे. आजची पिढी हे उद्याचे देशाचे भवितव्य असून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी खासगी शिकवण्या ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी मराठवाडा पालक संघाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, अध्यक्ष डॉ. भारत घोडके व अन्य पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या