नांदुर्गा उपकेंद्राची टीम थेट पोहोचली लसीकरणासाठी उसाच्या फडावर
औसा तालुक्यातील नांदुर्गा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती फेरे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम अतिशय प्रभावीपणे राबविली जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला हाणून पाडण्यासाठी आणि आपला परिसर कोरोना मुक्त करण्यासाठी डॉ.स्वाती फेरे सरसावल्या असून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम थेट गुबाळ येथील उसाच्या फडावर जाऊन ऊस तोड कामगारांना प्रतिबंधात्मक लस देण्याचा प्रयत्न जोमाने केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नांदुर्गा, गुबाळ, नांदुर्गा तांडा या परिसरात काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांची लसीकरण मोहीम त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबविली आहे. सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून शेकडो कामगार उसाच्या फडावर पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीचे काम करीत असताना हे ऊसतोड कामगार व प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहू नये या उद्देशाने डॉ.स्वाती फेरे यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर आर शेख तसेच मातोळा केंद्रातील व नांदुर्गा उपकेंद्रातील आरोग्य सेविका, व मदतनीस यांच्या सहकार्याने ही मोहीम त्यांनी अतिशय सक्षमपणे राबविली आहे. त्यामुळे या परिसरात डॉ.स्वाती फेरे यांचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.