विहिरीच्या मस्टरवर सही करण्यासाठी लाच ; 5 हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अटक

 विहिरीच्या मस्टरवर सही करण्यासाठी लाच ; 5 हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अटक..





औसा /प्रतिनिधी : - औसा तालुक्यातील कान्हेरी येथील एका शेतकर्‍यास शासकीय योजनेतून विहिर मंजूर झाली. मात्र या विहिरीच्या कामावरील मजूरांचे हजेरी मस्टरवर नावे नोंदवून त्यावर सही करण्यासाठी ग्रामसेवकाने चक्क पाच हजार रुपये स्वीकारत असताना लातूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कन्हेरी गावाचे ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबोयणे यास रंगेहाथ पकडले आहे. गावातील एका शेतकर्‍याला त्याच्या शेतात विहिर घेण्यास शासकीय नियमानुसार मंजुरी देण्यात आली. त्या विहिरीचेही काम चालू झाले. मात्र, हे काम करणाऱ्या मजुराचे मस्टरवर ग्रामसेवकाची सही आवश्यक असते. त्याशिवाय पुढील अनुदान मिळत नाही. मात्र ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबोयणे याने या मस्टरवर सही करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्या मागणीत कोणतीही तडजोड केली नाही. काल पाच हजार रुपयांची ही लाच औसा येथील मिनार हाॅटेल, हाश्मी चौक येथे स्वतः मोजून घेत असताना लातूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली लातूर उपविभागाचे उपअधीक्षक पंडित रेजीतवाड, पोलिस निरीक्षक भास्कर कुल्ली, संजय पस्तापुरे, रमाकांत चाटे, फारुख दामटे, भागवत कठारे, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर,संदीप जाधव, दिपक कलवले, मंगेश तोंडरे, रुपाली भोसले, राजू महाजन यांच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबोयणे यास पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासन शेतकऱ्यांना विविध योजनानुसार विहिरी देते. पण, ग्रामसेवक शेतकऱ्यांच्या विहिर अनुदान मिळण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडसर ठरत आहेत. शेतकऱ्यांची हमखास लुबाडणूक करणे हा प्रकार जिल्ह्यामध्ये वाढला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या