*नकुलेश्वर बोरगावला लाभला यादव कालीन इतिहास.*
अप्रसिद्ध शिलालेखाचे झाले वाचन.
इतिहास संशोधक कृष्णा गुडदे यांनी येथील शिलालेख वर केले संशोधन
औसा प्रतिनिधी
औसा (सा.वा.)दि.२४
नकुलेश्वर बोरगाव येथे ग्रामदैवत नकुलेश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात दोन शिलालेख आहेत. त्यातील एक शिलालेख खूपच खराब झाला आहे तर एक चांगल्या स्थितीत आहे. त्यावर लागलेले सिमेंट काढून इतिहास संशोधक कृष्णा गुडदे यांनी ठसे घेतले व संशोधन केले असता शिलालेख यादव कालीन असल्याचे सिद्ध झाले आहे व इतर ही माहिती उजेडात आली आहे.
शिलालेख ९ ओळींचा असून देवनागरी लिपीत आहे. भाषा संस्कृत व तत्कालीन मराठी मिश्र आहे. शिलालेखाची सुरुवात ओं अक्षराने झाली असून शके ११०८ पराभव संवत्सरे श्रावण पाडवा सोमवार रोजी शिलालेख लिहिला गेला. हे साल इ.स. ११८६ असे येते. त्यानंतर लेखात महाराजाधिराज सिंघनदेव याचा उल्लेख असून त्यानंतर त्याचा मुलगा महादेव याचा उल्लेख आहे. महादेव याचे राज्यातील एका आवर्तनातील(विभागातील) रेपालदेव दळवी याच्या अखत्यारीकेतील लकुळेश्वर देवा विषयी काही वृत्ती लावून दिल्याचे शिलालेखातून समजते. शिलालेखात उल्लेख आल्या प्रमाणे लकुळेश्वर देवाला ज्याने नैवैद्य दाखवले त्याने देवाची पूजा काजळ घालून न करणे व देवाचे मनोरंजन(रंगभोग) पूर्वजांच्या नियमाप्रमाणे व अखत्यारिखेप्रमाणे होईल असे सांगितले आहे.
शिलालेखात सिंघन देवाचा राजाधिराज अशी राजप्रशस्ती आली आहे तर महादेव याच्या पुढे कसलेही राजप्रशस्ती आली नाही. इ.स. ११८६ वेळी महादेव खूपच लहान असला पाहिजे. प्रत्यक्ष पाहता या वेळी भिल्लम पाचवा याचे राज्य होते. मात्र या भिल्लम राजाचे आपल्या भागात शिलालेख आढळले नसून त्याचे बहुतेक शिलालेख विजापूर व धारवाड जिल्ह्यात सापडले आहेत. म्हणजे तेंव्हा मराठवाड्याच्या काही भागावर सिंघण देव व युवराज महादेव राज्यकारभार पाहत असावेत. यादव सिंघन देव व महादेव यांचा कारकिर्दीचा विचार करता हा त्यांचा पहिला शिलालेख ठरतो. यादव भिल्लमने चालुक्यांची राजधानी कल्याणी काबीज केल्या नंतर त्याची घडी बसवताना राजकुटुंबातील व्यक्ती यांची नियुक्ती या प्रदेशावर केली. यादवांच्या प्रारंभीच्या इतिहासावर प्रकाश टाकताना हा शिलालेख महत्वपूर्ण ठरला आहे तर लातूर व उस्मानाबाद भागावर इ.स. ११८६ साली यादव सत्ता होती हे स्पष्ट होते.
शिलालेखाचे ठसे घेते वेळेस श्री शिवशंकर चापुले यांचे तर शिलालेख वाचनासाठी विक्रांत मंडपे यांची मदत झाली आहे.
बाईट: शिलालेखात लकुळेश्वर उल्लेख आलेले देवाचे मंदिर आजचे नकुलेश्वरचेच आहे. या शिलालेखाच्या वाचनाने बोरगाव गावचा, नकुलेश्वर देवाचा व परिसराचा इतिहास अनेक वर्षे मागे गेला आहे. आपल्या भागावरील यादवांच्या इतिहास उलगडण्यास या शिलालेखाने मदत झाली आहे. यावर लवकरच सविस्तर शोधनिबंध यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.