*काँग्रेस, आप, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचा बँक कर्मचार्यांच्या आंदोलनास पाठिंबा*
लातूर दि 29 : दि 28 आणि 29 मार्च रोजी देशभरातील नऊ कोटी संघटित व असंघटित क्षेत्रातील वीस कोटीपेक्षा अधिक कामगारांसह बँकींग क्षेत्रांमधील AIBEA , AIBOA आणि BEFI या तीन संघटना देशव्यापी संपामध्ये सहभागी आहेत. या संपाचा एक भाग म्हणून लातूर शहरातील जवळपास 300 बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्र लातूर मुख्य शाखेसमोर सरकारच्या सरसकट खाजगीकरण आणि कामगार कायद्यातील धोरणाविरोधात निदर्शने केली. बँकांचे खाजगीकरण हे देशहित विरोधी धोरण असून भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांवर याचे विपीरित परिणाम होईल असे मत बँक कर्मचार्यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
देशातील प्रमुख शहरांमध्ये बँक कर्मचारी आणि अधिकारी बँक खासगीकरण विरोधात निदर्शने करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेसमोर बँक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले की, सध्या बँकिंग उद्योगात एक अस्थिरतेचे, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. 1969 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. परिणामी आज देशातील प्रत्येक गावात आणि छोट्या खेड्यात देखील ना नफा ना तोटा या तत्वावर बँकांची सुविधा उपलब्ध झाली. यामुळे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक, कारागीरांच्यासह अत्यंत गरीब माणसाला देखील बँकेचे कमी व्याजदरात कर्ज घेऊन उद्योग उभारणीला चालना मिळाली. असे असताना सध्याचे सरकार बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1970, 1980 या कायद्यात दुरुस्ती करून सरकारी मालकीच्या बँकांचे खाजगीकरण करण्याचा डाव आखला आहे. बँक ग्राहक, बँकेचे ठेवीदार, भागधारक, अर्थतज्ञ, राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांना विश्वासात न घेता घेतला जात असून या देशविरोधी निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी-अधिकारी यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, असे कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. २८ व २९ मार्च चा संप हा सरकारच्या नवउदार आर्थिक धोरणांच्या विरोधात. ज्या धोरणांनी आपल्या देशाला पेच प्रसंगाच्या खाईत लोटले आहे त्याचप्रमाणे ते सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात देखील आहे. सरकार सर्रास कंत्राटी पद्धतीचा सर्वत्र अवलंब करीत आहेच तर नियमित कर्मचाऱ्यांनी ऐवजी बाह्यस्त्रोत कर्मचारी सर्वत्र वापरले जात आहेत. कामगार संघटनांचे अधिकार व स्थान यावर कायद्यातील दुरुस्तीतून हल्ला केला जात असून कामगारांच्या रोजगाराची सुरक्षितता हिरावून घेतली जात आहे असेही ते म्हणाले.
आजच्या आयोजित निदर्शने कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी श्री व्यंकट बेद्रे यानी भेट देऊन कर्मचार्यांच्या मागण्या रास्त आहेतच असे सांगत भविष्यात संघटनेच्या कोणत्याही कृतिकार्यक्रमास आमचा पाठिंबा राहील असेही सांगितले. तसेच काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी श्री मोहन माने यानी खाजगीकरण विरोधी मोहिमेद्वारे जनतेच्या मनातील असंतोषचे प्रकटीकरण होत असल्यामुळे सामान्य जनतेचा नक्कीच पाठिंबा मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तर आप पक्षाचे विक्रांत शंके यानी कार्यक्रमास भेट देऊन संघटनेच्या येणार्या सर्व आंदोलनात खांदयाला खांदा देऊन उभे राहू असे प्रतिपादन करत पाठिंबा दर्शविला.
आजच्या निदर्शनांमध्ये लातूर शहर आणि आसपासच्या परिसरातील जवळपास तीनशे ते साडेतीनशे बँक कर्मचारी अधिकारी सहभागी होते. तर आजच्या या बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूर शहर आणि जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँका वगळता इतर सर्व राष्ट्रीयकृतबँकेचे कामकाज ठप्प झाले होते. हा संप यशस्वी करण्यासाठी कॉ. परमेश्वर बडगिरे, कॉ. नरसिंग काळे, कॉ. बालाजी खांडेकर, कॉ. भीमाशंकर उडगे, कॉ. सदाशिव मुगावे, कॉ. दिवाकर,कॉ. पंकज आढाव,कॉ. नागेश मस्के, कॉ. रेश्मा भवरे, कॉ. सुजाता बनसोडे,कॉ. आकांक्षाकंकाळयांच्यासह अनेक कॉम्रेड उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.