गावातील रमजान आणि गावकरी मंडळी
-------------------_------------------+++++++
बशीर शेख ’कलमवाला’
रमजान म्हटलं की, लहानपणी डोळ्यासमोर यायचे सहेरी, इफ्तार, चांगले खानपान, सुखी-समाधानी माहोल. त्यामुळे लहानपणापासून रमजानचं सगळ्यांनाच आकर्षण. मी ही वयाच्या 10 व्या वर्षापासून रोजे ठेवायचो. जेव्हा मी पहिला रोजा धारण केला होता त्यावेळी समजलं की दिवसभर निर्जळी उपवास करायचा आहे, घोटभर पाणीही प्यायचे नाही. तसं दुपारपर्यंत काहीही वाटायचं नाही. मात्र दुपारनंतर जसा-जसा दिवस मावळतीकडे वळायला सुरू व्हायचा तसा-तसा घश्याला कोरड पडायला सुरूवात व्हायची. मात्र रोजात काहीही खाणेपिणे वर्ज्य असल्याने आणि अल्लाहची नैतिक भीती मनात असल्याने पाणी समोर असूनही, इच्छा होत असूनही मनावर एवंढ नियंत्रण असायचं की घोटभर वैध पाणीही प्यायचे नाही.
मनात यायचे की प्यावे पाणी; परंतु, आंतरआत्मा म्हणायचा आता आपणास कोणीही पाहत नाही मात्र अल्लाह तर पाहणारा आहे. जरा थोडा वेळ जाऊ द्या. मग झोपण्याकडे कल असायचा. थंड चिंचेच्या झाडाखाली जाऊन झोप घ्यायची आणि सायंकाळी असरच्या अजाननंतर सर्वात अधिक आनंद व्हायचा, चला आता इफ्तारची वेळ जवळ येत चालली आहे. जसं जसं इफ्तारची वेळ जवळ यायची तसं-तसं हलकान वाटायची. मात्र आतून मन एवढं कणखर व्हायचं की आपण एक मोठं कार्य करत आहोत. इफ्तारच्या वेळेस घरून खमंग पदार्थ घेऊन मस्जिदमध्ये जायचो. कधी-कधी इफ्तारला खजूर उपलब्ध नसायचे त्यावेळी काकडी, भाजी खावून रोजा सोडायचो. आजोबा सांगत आमच्यावेळी तर मीठ चाखून रोजा सोडायचे. इफ्तारच्या वेळेस गावातील बरेचसे हिंदू बांधवही मस्जिदमध्ये खजूर, टरबूज अथवा घरात छान बनविलेले पदार्थ मुलांच्या हातून पाठवून द्यायचे. आणि इफ्तार झाला की एवढा आनंद व्हायचा की जसं शेळीच पिल्लू आईचं दूध पिल्यानंतर बागडायला सुरूवात करतं तसा कैफ शरीरात संचार व्हायचा. ज्यावेळी मी पहिला रोजा धरला होता त्यादिवशी माझा छोटा सत्कारही झाला.
खरं तर गावात जिलानी सय्यद नावाचे ग्रहस्थ होते. त्यांच्यामुळे नमाज,रोजाची आवड निर्माण झालेली. रमजानच्या वेळेस हदीस पठण अधिक व्हायचं. त्यामुळे रोजाचे महत्त्व मौलाना समजावून सांगायचे. मलाही वाचनाची आवड असल्याने मी ही हदीस वाचण्याला अधिक भर द्यायचो. ज्यावेळेस रोजासंबंधी हदीस वाचन व्हायचं आणि रोजाचं महत्त्व ऐकायचं त्यावेळेस मन भरून यायचं. वाटायचं की आपण किती पुण्याचं काम करत आहोत. आपणांस किती पुण्य मिळणार आहे. वाचनात यायचे की, रोजा फक्त उपाशी राहण्याचं नाव नाही तर तुम्ही कोणास त्रास द्यायचा नाही, वाईट वक्टं बोलायचं नाही, कोणी भांडण करायला आले तर भांडायचं नाही. या काळात गरजूंना होईल तेवढी मदत करायची, रोजेदाराचं खास लक्ष ठेवायचं, या महिन्यात जो कोणी रोजेदारास एक खजूर, ग्लासभर पाणीही प्यायला देईल त्यास जन्नतमधील हौजे कौसरमधील पाणी अल्लाह पिण्यास देईल. त्यामुळे रोजाच्या काळात कटाक्षानं वरील बाबींचे पालन करायचे. चांगल्या सवयी मनात रूजत असल्याने मोठी मंडळी फार प्रेम करायची. सुरूवातीचे 10-12 दिवस थोडं त्रास व्हायचा मात्र त्या पुढे फारसा त्रास व्हायचा नाही. मन कशावरही जायचं नाही. या काळात शारीरिक त्रास संपला जरी असला तरी पाच वेळेसची नमाज आणि तरावीहचे पठण करायचा कल कमी व्हायचा. मात्र वडील अन् जिलानी सय्यद उर्फ नाना आम्हाला नमाजला आले नाही की घरी येऊन घेऊन जायचे. आज नाना हयात नाहीत मात्र त्यांनी जी नमाजची सवय लावली ती आजतागायत कायम आहे. त्यामुळे आयुष्यात माणसाने आपल्यापेक्षा लहानग्यांना कधीही चांगल्या सवयीचे वळण लावले तर ता हयात पुण्याई पदरात पडत चलते. आमच्या टाकळी (ढोकी, जि. उस्मानाबाद) या गावातील लोक फार मनमिळावू. एकमेकांच्या सुःख-दुःखाचे वाटेकरी. रमजानच्या काळात प्रकर्षाने जानवायचे की, गावातील इतर समाजातील लोक शेतातील भाजीपाला रमजानमध्ये खास करून घरी आणून द्यायचे. इफ्तारच्या वेळेस दररोज काही न काही मस्जिदमध्ये पाठवायचे. मनातून त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो. रमजानच्या शेवटच्या काळात गावातील इतर समाजातील काही महिला, पुरूष मोठे रोजे धरायचे. त्यावेळी आम्ही सहेरच्या वेळेअगोदर उठून मस्जिदमध्ये जावून स्पिकरमधून सहेरीची वेळ झाली उठा असे म्हणायचो. त्यांच्या घराजवळ जावून कधी कधी आवाज द्यायचो. नंतर सहेरीचे खाद्यपदार्थ घेऊन जायचो. यावेळी इतका आनंद वाटायचा की आपण किती सुंदर समाजात जन्मलो असे वाटायचं. आमच्याच गावात नाही तर आमच्या आजोबाच्या सांगवी या गावातही असाच माहोल पहावयास मिळायचा. शेजारी इर्ला या गावातही मुस्लिम समाज मोठ्या संख्येने असल्याने इथेही रमजानचा माहोल अधिक पहावयास मिळायचा. सुरूवातीच्या काळात आमच्या गावात ईदगाह नसल्याने इर्ला या गावात ईदची नमाज पठणासाठी जाण्याचा योग यायचा. यावेळी गावातून काही लोक चालत, काही सायकलवर तर काही बैलगाडीनेही जायचे. जाताना तर इतकं सुंदर आणि प्रफुल्लित वाटायचं की आनंदाचा पारावर उरायचा नाही. येतानाही सलाम, दुआ, भेटी-गाठी भरपूर व्हायच्या. ज्यावेळेस आमच्या गावात मस्जिद झाली आणि ईदची नमाजही तिथेच अदा करायचा सुरूवात झाली तेव्हा ईदच्या नमाज वेळेस गावातील बारा बलुतेदार मस्जिद समोर येऊन बसायचे. नमाजला येतानाच आम्ही पिशवी, पोत्यामध्ये फित्रा देण्यासाठी गहू घेऊन यायचो. आजोंबाकडून खास चिल्लर पैसे मागून घ्यायचो. हे पैसे बारा बलुतेदारांना फित्रा वाटतांना द्यायचो. यावेळी गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक ईदच्या शुभेच्छा द्यायचे. ईद-उल- फित्रच्या दिवशी मी मित्र कंपनी, वडिलांचे मित्र व शेजारी या सर्वांना जेवणाचे आवतन द्यायचो. त्यामुळे अख्खा दिवस सेवा करण्यात जायचा. आनंद यायचा आणि ईद साजरी व्हायची. या आपुलकीमुळे आजपर्यंत कधी कोणाशी वैर झाले नाही आणि कधी कोणाबद्दल द्वेष मनात निर्माण झाला नाही.
दैनंदिन जीवनात जगताना हदीस आणि कुरआनची वचने मनात कल्लोळ निर्माण करतात जेव्हा कधी काही वाईट घडत असेल आणि कधी द्वेष पसरत असेल. आताच्या काळात प्रेम आणि आपुलकी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. शासन आणि त्याची धोरणं तसेच द्वेषामुळे शहरासह गावातील वातावरणही दूषित होताना दिसत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी विशेष करून रमजानमध्ये आपुलकी, प्रेम आणि सदाचार वाढविण्यासाठी कसोशिने प्रयत्न करावेत. कुरआन आणि हदीसची मानवकल्याणासाठीची वचने फक्त ऐकून, वाचून चालणार नाहीत तर ती अमलात आणावी लागतील. जगण्याचा भाग बनवावा लागेल. लोकांपर्यंत ती पोहोचवावी लागतील. आज देशात द्वेषी राजकारणाचा काळ आला आहे. मात्र एवढे खरे की हे दिवसही निघून जातील आणि पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण परत निर्माण होईल. कारण वैर हे अल्पजीवी असते आणि प्रेम चिरंजीवी. मात्र प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपला शेवट हा ईमानवंत म्हणून व्हावा, सदाचारी आणि प्रेमळ व्यक्ती म्हणून व्हावा, सर्व समाजघटकांशी नाळ जोडणारा आणि प्रत्येकाला सत्कर्माकडे घेऊन जाणारा व्हावा. मला, तुम्हाला आणि सर्व चिमुकल्यांना ईश्वर सन्मार्ग दाखवो आणि आमच्या देशाची बिघडत चाललेली घडी पुन्हा सत्यमार्गाकडे वळो, हीच अल्लाहकडे प्रार्थना आमीन.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.