*महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांची लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आज दिनांक 26/05/ 2022 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर यांनी डायल 112 कंट्रोल रूम येथील कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मा.कल्पना चव्हाण मॅडम यांना दिली.
या प्रसंगी मा. संगीता चव्हाण मॅडम यांच्या हस्ते पिंक पेटी चे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभाग्रहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे , सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम,परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी , दामिनी पथक व भरोसा सेल च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे व इतर महिला पोलीस अधिकारी,अंमलदार तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील संरक्षण अधिकारी,महिला सहाय्य कक्ष येथील स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांविरोधातील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायदेविषयक साक्षरता व जलद कारवाई करणे आवश्यक असून महिला प्रश्नांच्या मुळाशी जाऊन वेळीच प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. ऊसतोड महिला कामगारांपासून ते विविध शहर महानगरात शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी कायदे केले आहेत. या कायद्यांची अधिक साक्षरता होणे आवश्यक असून कायद्याचा धाक आणि दक्ष प्रशासकीय यंत्रणा असणे अंत्यत महत्वाचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपास यंत्रणांना सहकार्य तेवढेच महत्वाचे आहे. विशेषत: एखादी घटना घडली तर त्याची माहिती महिलांना तात्काळ सांगता यावी यासाठी ग्रामपंचायत पातळीपासून यंत्रणा भक्कम असली पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीचे दर्शनी भागावर संरक्षण अधिकारी आणि 112 हा पोलीस हेल्पलाईन संपर्क क्रमांक व इतर आवश्यक दूरध्वनी क्रमांक हे ठळक अक्षरात लिहिले पाहिजेत, अशा सूचना ॲड. संगिता चव्हाण यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला व संरक्षण अधिकारी यांना दिल्या. संरक्षण अधिकारी हा शासनाने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, ज्या महिलांना मदत हवी आहे त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला देण्यात आला आहे. कार्यालयातील त्यांची जागा ही महिलांसाठी अधिक आश्वासक असली तरच संबंधित महिला या विश्वासाने त्यांना माहिती देऊ शकतील. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, संरक्षण अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी यांचा योग्य समन्वय असेल तर महिलांच्या अत्याचाराला आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लातूर पोलीस दलाच्यावतीने महिला सुरक्षेकरीता भरोसा सेल, पोलीस काका व पोलीस दिदी, दामिनी पथक, मनोधैर्य योजना, अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, विशाखा समिती, बालकांचे हक्क व सुरक्षा, या पथदर्शी प्रकल्पाची माहिती त्यांनी घेतली. विशाखा समिती हे एक सुंदर माध्यम आहे. प्रत्येक कार्यालयात या समिती असणे बंधनकारक आहे. याचबरोबर या समितीतील सदस्यांची जागरूकता असणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यात या सर्व समित्यांचे काम योग्य दिशेने सुरू असून त्यांनी यावेळी विविध विभागांचाही महिलाविषयक प्रश्नांच्या दृष्टिने आढावा घेतला.
महिलांच्या संरक्षणासाठी हेल्पलाईन नंबर 112, संबंधित तालुक्याचे संरक्षण अधिकारी, ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवरील ग्रामसेवक यांचे दूरध्वनी क्रमांक महिलांना सहज उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लातूर पोलीस विभागातर्फे महिलांसाठी भरोसा सेल, पोलीस काका, पोलीस दिदी अभियान,शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक, मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन, ज्येष्ठ नागरिक सेल, मुलांसाठी सायबर सेल, विशाखा समिती आदी माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दामिनी व भरोसा सेल चे साहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे यांनी दिली.
यावेळी भरोसा सेल येथे भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली व उत्कृष्ट कामगिरी बद्दल कौतुक केले. यावेळी समुपदेशन होऊन नांदायला पाठवलेल्या जोडप्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.