प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची मुदतवाढ

 प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेअंतर्गत

लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची मुदतवाढ






औरंगाबाद,दि.12, (विमाका) :-        राज्यातील लाभार्थी शेतक-यांस ई-पोर्टलवर अर्ज करण्यास, लाभार्थी हिस्सा भरण्यास व इतर अंमलबजावणी संदर्भात अडी-अडचणी असल्यास महाऊर्जाच्या खालील दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वा. पर्यंत संपर्क साधावा.  तसेच योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची सुधारित अंतिम मुदत दि. 31 मे, 2022 पर्यंत वाढविण्यात येत आहे.  तरी लाभार्थ्यांने दि. 31 मे, 2022 पर्यंत लाभार्थी हिस्सा जमा करावा.

राज्यातील महाकृषी अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एस.एम.एस. व्दारे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभार्थी शेतक-यांनी ऑनलाईन / धनाकर्षाव्दारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावा. 

तसेच असेही निदर्शनास आले आहे की, जिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र ई-पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत आहेत.   संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकामधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये भेट देऊन अर्ज स्विकारण्यासाठी तगाता लावत आहेत.

तेव्हा सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकांचा लाभार्थी म्हणून सौर कृषी पंपाची ई-पोर्टलवर चुकीचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करुन नोंद केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

पीएम-कुसुम योजनेअंतर्गत 50000 सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे सद्य:स्थितीत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगांव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील उपरोक्त उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.  तसेच अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप उपलब्ध असून लाभार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या