लाहोटी स्कूलच्या विद्यार्थ्यांची महास्कुल-संसद साठी निवड
लातूर, प्रतिनिधी
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. शालेय विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही व संसदीय कार्यप्रणालीची माहिती व्हावी म्हणून राजा नारायण लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय लोकशाही व सुशासन संबंधी धडे दिले जातात. याचाच एक भाग म्हणून स्कूलच्या विद्यार्थ्यांची दीपस्तंभ चारिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित महा स्कूल संसदसाठी निवड झाली आहे.
दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी पुणे येथे स्कूल संसद स्पर्धेचा प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी पात्र झाले असून त्यांची निवड फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या महा स्कूल संसद साठी झाली आहे.
स्पर्धेची वाढती पातळी ही तरुणांसाठी योग्य आहे का आणि भारताच्या वाढत्या कार्यक्षम मनुष्यबळाला ते आव्हानात्मक ठरेल का या विषयावर लाहोटी स्कूलच्या स्पर्धकांनी आपले मत सादर केले. सोनम गटागट या विद्यार्थिनींने पंतप्रधानाच्या भूमिकेत तर आर्या कासारखेडकर व अबोली गोजमगुंडे यांनी खासदार यांच्या भूमिकेतून विषयाची मांडणी केली.
स्पर्धकांनी केलेली अत्यंत सखोल व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे परिक्षकांची मने जिंकून घेतली. सोमवारी सकाळी दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला यामध्ये राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल महास्कूल संसद-2023 साठी पात्र झाल्याचे घोषित करण्यात आले. स्पर्धकांना विनोद चव्हाण, रेश्मा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत राज्यभरातून दीडशे शाळा सहभागी झाल्या होत्या.
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, संस्था अध्यक्ष शैलेश लाहोटी सचिव ॲड. आशिष बाजपाई, स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी, प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलु, प्रविण शिवणगीकर, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थ्यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.