श्री सिद्धेश्वर कृषि महोत्सवाचा समारोप; कृषि प्रदर्शनी व विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल
लातूर, दि. 02 (जिमाका) : राज्य शासनाचा कृषि विभाग, आत्मा कार्यालय आणि श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजित श्री सिद्धेश्वर कृषि महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. श्री सिद्धेश्वर मंदिर येथील विलासराव देशमुख यात्री निवास हॉलमध्ये झालेल्या कृषि महोत्सवातील विविध दालनांमध्ये सुमारे 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल झाली.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर होते. तसेच यावेळी विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन दिग्रसे, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे कृषि विद्यावेत्ता अरुण गुट्टे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर. एस. पाटील, कृषि अधिकारी महेश क्षीरसागर, आर. टी. जाधव, विश्वस्त अशोक भोसले, विशाल झांबरे, कृषि उपसंचालक श्वेता गिरी, अंजली गुंजाळ, गोपाळ शेरखाने उपस्थित होते.
पाच दिवशीय कृषी महोत्सवामध्ये कृषि प्रदर्शनी व विक्री, चर्चासत्रे यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सुमारे दोनशेहून अधिक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व खाजगी कंपन्यांनी कृषि प्रदर्शनीमध्ये स्टॉल उभारले होते. यामध्ये सेंद्रिय उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, डाळी, पापडी, तृणधान्य पदार्थापासून बनवली जाणारी पापड, कृषि अवजारे, नवतंत्रज्ञान आदी स्टॉलचा समावेश होता.
कृषि विभागाच्या विविध योजना सर्व शेतकऱ्यापर्यंत विहित मुदतीत होचाव्यावत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषि विभागाचे अनुदान मिळवून द्यावे. तसेच आगामी खरीप हंगामात सोयाबीन पिकावरील कीड रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिवेकर यांनी दिल्या.
कृषि महोत्सवात पाच दिवसांमध्ये दररोज पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. तसेच एका स्टॉल पासून किमान 55 हजार पासून दीड लाख रुपयापर्यंत दररोज विक्री झाली. यातून कृषि महोत्सवात किमान 25 ते 30 लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन जांबूतकर यांनी कृषी महोत्सव उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल कृषि विभागाचे आभार व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांचा सन्मान करत असताना शेतकऱ्याने अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सचिन दिग्रसे, अरुण गुट्टे, अशोक भोसले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील 30 शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका तंत्र व्यवस्थापक व सहाय्यक तंत्र व्यवस्थापक यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे व उद्धव फड यांनी केले, तर कृषि उपसंचालक आर. एस. पाटील यांनी आभार मांनले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.