अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांची कारवाई.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील 24 कॉफीशॉप, कॅफे चालकावर गुन्हे दाखल.
लातूर रिपोर्टऱ
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील कॉफीशॉप व हॉटेल बद्दल लातूर पोलिसाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने लातूर पोलिसांकडून वेळोवेळी सदर कॉफी कॅफे, हॉटेलवर कार्यवाही करण्यात येत होती. परंतु सदर आस्थापना चालकावर प्रभावी निर्बंध नसल्याने, कॉफीकॅफे व हॉटेल मध्ये गैरकृत्यांना चालना मिळेल अशा प्रकारची बैठक व्यवस्थेत व इतर बाबीत बदल करून महाविद्यालयीन युवक-युवतींना बसण्यास मुभा दिली जात होती. त्यामुळे कॉफीशॉप व हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले-मुलींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. नमूद व्यवसाय चालक हे त्यांना बसण्याकरिता म्हणून कालावधीनुसार शुल्क आकारून गैर्यकर्त्यास चालना देत होते. सदर कॉफीशॉप, हॉटेलमध्ये युवक व युवती तसेच अल्पवयीन मुले-मुली हे तासनतास बसून अश्लील वर्तन करीत असल्याचे निदर्शनास येत होते.
सदर ठिकाणी बालकांच्या बाबतीत लैंगिक चाळे देखील होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून कॉफी कॅफे शॉप व हॉटेल चालकांवर पुरेसे निर्बंध नसल्याने भारतीय दंड संहिता कलम 376, 363, 354, 509 तसेच बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे घडत असून प्रसंगी गंभीर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
तसेच लातूर शहर व जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध व महत्त्वाचा असून लातूर शैक्षणिक पॅटर्नमुळे संपूर्ण महाराष्ट्र व बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी जिल्ह्यात येत असून शिक्षणासाठी येणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी कॉफी कॅफे,हॉटेल यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता लातूर जिल्ह्यातील कॉफी कॅफे शॉप, हॉटेल यांच्यावर निर्बंधाबाबतीत नियमावलीची अधिसूचना जारी होणे बाबतचा सविस्तर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी कार्यालय,लातूर यांच्याकडे पाठविला होता. त्यावरून जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर यांनी कॉफी कॅफे शॉप, हॉटेल बाबत 20 जून 2023 रोजी नियमावलीची अधिसूचना जारी करून सदर कॉफी शॉप कॅफेना 9 जुलै पर्यंत आवश्यक ते बदल करण्याची मुभा दिली होती.
तरीपण लातूर जिल्ह्यातील व शहरातील काही कॉफी शॉप कॅफेच्या चालकांनी मा. जिल्हाधिकारी, लातूर यांनी घालून दिलेल्या नियमाची पूर्तता केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्वच कॉफीशॉप व कॅफेची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यावरून अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे अधिकारी/अमलदारांनी तसेच दामिनी पथकाचे अधिकारी/अमलदारांनी एकाच वेळेस विशेष तपासणी मोहीम राबवून कॉफीशॉप, कॅफेची तपासणी केली.
सदर तपासणीमध्ये मा. जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या खालील नमूद एकूण 24 कॉफीशॉप, कॅफेच्या चालकावर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये 2 गुन्हे, गांधी चौक हद्दीमध्ये 2 गुन्हे, दामिनी पथकाकडून 2 गुन्हे, अहमदपूर येथे 2 गुन्हे व उदगीर शहर येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतरही तपासणी मोहीम सलग सुरूच राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.