इमाम हुसैन रजि. यांच्या शहादतीमागचे मूळ कारण
🪶एम.आय. शेख
▪️इमाम हुसैन रजि. यांच्या शहादतीला आज 29 जुलै 2023 रोजी 1384 वर्षे पूर्ण झालीत. एवढा मोठा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा ती कोणती गोष्ट आहे जी मुस्लिमांना त्यांच्या शहादतीमुळे दुःखी करते? तसे पाहता इस्लामी इतिहासामध्ये अनेक युद्ध झालेली आहेत. त्यात हजारो सहाबा रजि. आणि इतर मुजाहिद शहीद झालेले आहेत. त्या सर्वांच्या शहादतीचे एवढे दुःख होत नाही. मग काय कारण आहे इमाम हुसैन रजि. यांच्या शहादतीचे एवढे प्रचंड दुःख एवढा मोठा कालावधी लोटल्यावरसुद्धा मुस्लिम समाजाला होतो. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याच आपण प्रयत्न करूयात.
▪️भारतातच नव्हे तर जगात या तारखेला अनेक लोकांनी उपवास ठेवला. शिया बंधूंनी मोठ्या प्रमाणात दुःख साजरे केले. ढोबळमानाने इमाम हुसैन रजि. आणि त्यांच्या कुटुंबातील 72 लोकांच्या शहादतीचे हे दुःख आहे असे वाटते. परंतु हे वरवरचे कारण झाले. शहीद होण्यापूर्वी इमाम हुसैन रजि. हे आपल्या 72 सोबत्यांना घेवून कुफ्यासाठी का रवाना झाले होते? या प्रश्नाच्या उत्तरातच या दुःखाचे मर्म दडलेले आहे.
▪️मित्रांनों...! कल्पना करा, एखाद्या वाहनात तुम्ही बसून एका विशिष्ट गावाकडे जात आहात. त्या गावाला जाणारा रस्ता तुम्हाला तोंडपाठ आहे. वाहन चालविणारी व्यक्ती वाहन 40 किलोमीटर पर्यंत योग्य दिशेने चालविते. त्यानंतर मात्र चालक वाहनाची दिशा बदलतो. तेव्हा तात्काळ तुमच्या लक्षात येते की वाहनाने दिशा बदलेली आहे आणि हे आपल्या गंतव्याच्या ठिकाणापासून लांब जात आहे. असेच काहीसे इमाम हुसैन रजि. यांच्या लक्षात आले की, 40 वर्षापासून इस्लामी खिलाफत समग्र मानवकल्याणाच्या दिशेने जात होती. यजीदने शासनाची सुत्रे हाती घेताच त्याच्या खिलाफतीने दिशा बदलली आणि तो आता मानवकल्याणाच्या दिशेला न जाता मुलुकियत (राजेशाही)च्या दिशेने चालला आहे. राजेशाहीमध्ये राजा महत्त्वाचा असतो आणि प्रजा गौन. हा बदल ठीक त्या वाहनासारखाच आहे. ज्या वाहनाने 40 किलोमीटर सरळ जाऊन मग दिशा बदलली होती.
▪️प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना येथे पहिले स्वतंत्र इस्लामी लोकशाही राज्य स्थापन केले आणि दहा वर्षे ते चालविले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन 30 वर्षे चार पवित्र खलिफांनी शासन चालविले. त्यानंतर मात्र हजरत अमीर मुआविया रजि. यांनी बळजबरीने खिलाफतीची सुत्रे आपल्या हातात घेतली आणि 20 वर्षे शासन चालविले. त्यांच्या कारकिर्दीला जरी खिलाफत म्हणून संबोधले जात असले तरी त्यात जनकल्याणाची ती ऊर्जा आणि व्यापकता नव्हती जी मागील 40 वर्षात होती. म्हणूनच त्यांचा पवित्र खलीफांमध्ये समावेश केला जात नाही. असे असले तरी त्यांच्या 20 वर्षाच्या शासकीय कारकिर्दीला अन्यायकारक म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती. सगळीकडे इस्लामी शरियत लागू होती, न्यायालयातून इस्लामी शरियतीप्रमाणे समान न्याय दिला जात होता, समान वागणूक दिली जात होती. मात्र त्यांनी आपल्या हयातीतच आपला पुत्र यजीद याची राष्ट्रप्रमुख म्हणून नेमणूक केली आणि स्थितीमध्ये एकदम बदल झाला.
▪️यजीदला जनसमर्थन प्राप्त नव्हते. शासकीय सामर्थ्याच्या भीतीमुळे लोकांनी त्याच्या हातावर बैत (समर्थन) केली होती. अनेक लोक आतून असंतुष्ट होते. त्यांना प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि चार पवित्र खलिफांप्रमाणेच भविष्यात शासन चालवावे असे वाटत होते. त्यासाठीच त्यांनी शेकडो पत्र पाठवून इमाम हुसैन यांना कुफा (इराण) येथे आमंत्रित केले होते. लोकांची तीव्र इच्छा होती की इमाम हुसैन रजि. यांनी कुफा येथे येऊन यजीदला पदच्युत करून स्वतः खिलाफतीची सुत्रे हाती घ्यावी. त्यासाठी ते स्वतः मदत करण्यासाठी तयार होते. हजरत इमाम हुसैन रजि. यांनाही एव्हाना कळून चुकले होते की, यजीद हा व्यापक जनकल्याणाऐवजी विलासितापूर्ण जीवन जगून शासन चालवीत आहे. आपले आजोबा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्थापन केलेल्या राज्याला असे वाईट वळण आपल्या डोळ्यादेखत लागतांना ते पाहू शकत नव्हते. म्हणून त्यांनी कुफेकडे आगेकूच केली. मग करबला येथे यजीदचा सैनिक कमांडर बिन जियाद याच्याशी त्यांची गाठ पडली. त्याने इमाम हुसैन रजि. यांना यजिदचे समर्थन करून मंत्रीपद मिळविण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. व्यापक जनहिताचा आपल्या आजोबांच्या मूळ उद्देशाचा त्याग करून ते स्वतःचा आणि सोबतच्या 72 जणांचा जीव वाचवू शकले असते. परंतु त्यांनी व्यापक जनकल्याणासाठी स्वतःआणि आपल्या कुटुंबातील 72 लोकांचा मृत्यू (शहादत) पत्करण्याला पसंती दिली.
इस्लामी लोकशाहीचे मुलभूत तत्त्च
▪️व्यापक जनकल्याणकारी शासकीय धोरण ही एक सर्वसाधारण शब्दावली झाली. परंतु या धोरणाची मुलभूत तत्त्व कोणती आणि यजीदच्या शासनामुळे त्या तत्त्वांना कसा धोका निर्माण झाला होता? हे समजून घेेतल्याशिवाय वाचकांच्या लक्षात इमाम हुसैन यांच्या त्यागाचे महत्त्व कळणार नाही.
इस्लामी लोकशाहीची 7 मुलभूत तत्त्व आहेत.
1️⃣ इस्लामी लोकशाहीचे पहिले तत्त्व म्हणजे : अंतःकरणातून या गोष्टीचा स्वीकार करणे की, जमीन ईश्वराची, हुकूम ईश्वराचा, प्रजा ईश्वराची आणि शासक ईश्वराचा नायब. त्याच्याकडे शासन चालवितांना अमर्यादित अधिकार नाहीत. तो ईश्वर आणि प्रजा दोघांनाही जबाबदार आहे. मात्र तो ईश्वराच्या मर्जीप्रमाणे शासन करेल, प्र्रजेच्या (शरियतबाह्य) मर्जीप्रमाणे नाही. हे तत्त्व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपल्या दहा वर्षाच्या शासन काळात आणि चार पवित्र खलीफा यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या शासन काळात जोपासले होते. यजीदने मात्र या तत्त्वाला हरताळ फासाला होता. त्याने इस्लाममध्ये नव्याने प्रवेश केलेल्या लोकांवरही, ”जिझिया” लावला होता. एकीकडे प्रेषित आणि चार पवित्र खलीफांचे जीवन ’उपभोग शुन्य स्वामी’ सारखे होते. तर यजीदचे जीवन निरंकुश विलासी बादशाह सारखे होते. त्याच्या या निरंकुशतेला आव्हान देण्यासाठीच इमाम हुसैन यांनी त्याच्यासोबत करबलामध्ये युद्ध करण्याचा निर्णय घेतला.
2️⃣ इस्लामी लोकशाहीचे दूसरे तत्त्व अम्र बिन मआरूफ आणि नहीं अनिल मुनकर हे आहे. याचा अर्थ इस्लामी रियासतीच्या शासन प्रमुखाचे हे कर्तव्य आहे की, त्याने समाजामध्ये चांगल्या गोष्टींना उत्तेजन द्यावे व वाईट गोष्टींचा नायनाट करण्याचा प्रयत्न करावा. समाजामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या नागरिकांना आकर्षित करणार्या परंतु त्यांना नुकसान पोहोचविणार्या असतात. उदा. दारू, ड्रग्ज किंवा अन्य नशा आणणार्या पदार्थांची निर्मिती , वाहतूक, विक्री आणि वापरण्यासाठी परवानगी देणे. अश्लील साहित्य, चित्र, चलचित्र, क्लिप्स, सिरियल्स, सिनेमा यांना परवानगी देणे. डान्सबार, बियरबार, वेश्यालये आणि जुगाराचे अड्डे यांना परवानगी देणे. थोडक्यात समाजाला हानी पोहोचविणार्या प्रत्येक वाईट गोष्टीवर शासकीय अधिकारांचा वापर करून नियंत्रण ठेवणे आणि समाजोपयोगी कामांना उत्तेजन देणे, या गोष्टी शासकीय ताकद वापरून बंद करणे तसेच चांगल्या गोष्टींना उत्तेजन देणे हे खलीफाचे कर्तव्य असते. बादशाही किंवा आधुनिक लोकशाहीमध्ये नेमकी स्थिती उलट असते. जनतेला वाममार्गामध्ये व्यस्त ठेऊन आपली सत्ता बळकट करण्याची प्रवृत्ती असते. त्यासाठी समाजाला हानीकारक असणार्या सर्व गोष्टींची खुली परवानगी दिली गेलेली असते.
3️⃣ इस्लामी संविधानाचे मुलभूत तत्त्व : यात खालील उपतत्त्वांचा समावेश होतो.
1. (खलीफा) शासन प्रमुखाची निवड जनतेतून व्हायला हवी. परंतु यात थोडासा फरक आहे. खलीफाची निवड साहेब-उल-राय लोक करत असतात. आधुनिक लोकशाहीमध्ये एका उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीलाही एकच मत देण्याचा अधिकार असतो आणि मजुराला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार असतो. यामुळे निवड चुकते आणि चुकीची माणसं सत्तेवर येतात. इस्लाममध्ये कुरआन आणि हदीसचा गहन अभ्यास असणार्या लोकांना साहेबुल राय म्हणतात व त्यांच्यावरच खलीफा निवडीची जबाबदारी असते. यातून निवड चुकत नाही.
2. शुराई निजाम (सल्लागार मंडळ व्यवस्था) ः खलीफा हा साहेब-उल -राय लोकांपैकी काही लोकांना आपले सल्लागार म्हणून निवडतो. आजकाल जसे पंतप्रधान निवडून आलेल्या खासदारांमधून आपले कॅबिनेट मंत्री निवडतात तसे. खलीफा हा कुरआन / हदीस आणि सल्लागार मंडळाच्या सल्ल्याप्रमाणेच शासन चालवू शकतो स्वतःच्या मर्जीप्रमाणे नाही.
3️⃣ अभिव्यक्ती स्वातंत्र्य : हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार इस्लामी लोकशाहीमध्ये नागरिकांना मिळालेला असतो. हे इस्लामी लोकाशाहीचे संवैधानिक उपतत्व आहे. या ठिकाणी कतर टि.व्ही. द्वारा निर्मित हिंदीमध्ये डब केलेली एक सिरियल जिचे नाव ’उमर’ आहे. हे पाहण्याचे आवाहन मी वाचकांना करतो. त्यांनी आवर्जुन ही सिरियल पहावी. त्यात अभिव्यक्तीच्या अधिकाराप्रमाणे एक बद्दू (खेडूत अरबी नागरिक) आणि एक बद्दू महिला खलीफा उमर रजि यांना कोणत्या भाषेत जाब विचारतात आणि खलीफा उमर रजि. किती नम्रपणे त्यांना उत्तर देतात हे पाहण्यासारखे आहे.
4️⃣ इस्लामी लोकशाहीमध्ये ईश्वर आणि नागरिक दोघांच्या समोरही शासनकर्ता खलीफा जबाबदार असतो. ही एक शासनकर्त्यावर चेक आणि बॅलेन्सची सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. कुरआन आणि हदीसमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे खलीफा तुसभरही इकडे तिकडे हलू शकत नाही. समजूतदार नागरिक त्याला असे करूच देत नाहीत आणि हे अधिकार नागरिकांना कुरआनने दिलेले आहेत.
5️⃣ बैतुलमाल : बैतुलमाल अर्थात आधुनिक भाषेत ट्रेजरी किंवा शासकीय कोष. यात रियासतकडे विविध मार्गातून संपत्ती जमा होते. उदा. खनीज संपत्ती विकून, जनतेतून कर गोळा करून किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार करून मिळविलेली संपत्ती इत्यादी. या संपत्तीला इस्लाममध्ये निराधाराची संपत्ती असे म्हटले जाते. यात शासनकर्त्या खलीफा किंवा सल्लागार मंडळातील लोकांना एक छदामही व्यक्तिगत वापराला घेता येत नाही. हां! यापैकी कोणी खरोखरच नादार असेल त्याला शासकीय निधीतून तेवढीच रक्कम दर महिना दिली जाते जेवढी सर्वसाधारण नागरिकाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असते. बाकी सर्व संपत्ती देशाच्या आणि नागरिकांच्या विकासावर खर्च करावी लागते.
6️⃣ न्यायाचे राज्य : साधारणपणे लोकशाही देशांमध्ये कायद्याचे राज्य असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. प्रत्यक्षात कायद्याचे राज्य नसते हे आपल्याला माहितच आहे. अॅक्ट वेगळा असतो आणि फॅक्ट वेगळी असते. कायदा तर सोडा संविधानाच्या चौकटित राहून संवैधानिक तरतुदींचीच गळचेपी केली जाते, हे ही आपल्याला माहित आहे. इस्लामिक लोकशाहीमध्ये कायद्याचे राज्य म्हणजे सांगण्यासाठी कायद्याचे राज्य नसून प्रत्यक्षात न्यायाचे राज्य अपेक्षित आहे. अनेक नागरिकांनी आपापल्या काळातील इस्लामी शासनातील मंत्र्यांविरूद्ध इतकेच नव्हे तर थेट खलीफांविरूद्ध कोर्टामध्ये खटले दाखल करून जिंकलेे असल्याचे पुरावे इस्लामी इतिहासामध्ये मिळतात.
7️⃣ समानता : धर्म, रंग, दर्जा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता सर्वांना समान वागणूक देणे इस्लामी लोकशाहीमध्ये खलीफावर बंधनकारक आहे.
एक सफ में खडे हो गए महेमूद व अयाज
ना कोई बंदा रहा ना कोई बंदानवाज
▪️या शेरमध्ये म्हटल्याप्रमाणे इस्लामी खलीफाला त्याच्या राज्यात सर्व नागरिकांमध्ये समानता प्रस्थापित करावी लागते.
♦️ही ती सात इस्लामी शासनाची दिशादर्शक तत्वे आहेत. ज्यांचे उल्लंघन यजीदकडून होत असल्याचे लक्षात आल्यामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवाची तमा न बाळगता व परिणामांची चिंता न करता इमाम हुसैन रजि. यांनी शहादत पत्करली. परंतु दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की, जागतिक मुस्लिम समाजाने त्यांच्या या शहादतीचा म्हणावा तेवढा सन्मान केला नाही. किंवा त्यांचे त्याग व्यर्थ गेले असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. चार पवित्रा खलीफांनंतर खलीफा उमर बिन अब्दुल अजीज सारखे बोटावर मोजण्यासारखे शासक इस्लामी इतिहासात झालेत. ज्यांनी इस्लामला अपेक्षित असलेल्या कल्याणकारी लोकशाहीची कास धरली. यजीद ज्या उमवी खिलाफतीचा दावेदार होता त्या खिलाफतीत, त्यानंतर अब्बासी खिलाफतीत, त्यानंतर उस्मानी खिलाफतीत फक्त नाव खिलाफतीचे होते. मुळात ते सर्व शासन राजेशाही पद्धतीने चालविले गेले. भारतात 700 वर्षांचा मुस्लिम शासकांचा इतिहासही खिलाफतींचा इतिहास नसून बादशाहीचाच इतिहास राहिलेला आहे.
∆ या मुहर्रमनिमित्त इस्लामी लोकशाहीची मूलतत्वे कोणती? हे जरी वाचकांनी समजून घेतले तरी त्यांचे उर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाहीत. या एका लेखात या तत्त्वासंबंधी सविस्तर माहिती देणे कोणालाही शक्य नाही. पण हा लेख वाचून वाचकांनी सय्यद अबुल आला मौदुदी रहे. यांनी लिहिलेल्या ’खिलाफत आणि मुलूकियत’ तसेच इस्लामी राज्यकर्त्यांचा जागतिक इतिहास वाचण्याचा निश्चय केला तरी माझा हा लेख लिहिण्याचा उद्देश यशस्वी झाला असे मला वाटेल.
🤲 शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, "ऐ अल्लाह! इमाम हुसैन रजि. यांच्या त्यागाला समजून घेऊन त्या त्यागाची कदर करण्याची समज आम्हा सर्वांना प्रदान कर.” आमीन.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.