गणेशउत्सव, ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिस सज्ज. कोंबिंग ऑपरेशन,अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहीम.05 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. बैठका, गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई, ठिक-ठिकाणी नाकाबंदी व रूटमार्च चे आयोजन
लातूर (प्रतिनिधी )
सण उत्सवाच्या अनुषंगाने सण-उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडावे याकरिता दिनांक 16/09/2023 ते 18/09/2023 संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष कारवाई मोहीम, तसेच कोंबिंग ऑपरेशन, रूटमार्च, शांतता समितीच्या बैठका, मोठ्या प्रमाणात गाव भेटी, संपर्क अभियान, गुन्हेगार व शांतता भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई मोहीम राबविण्यात आली. अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या 3 दिवसीय विशेष मोहिमेमध्ये
- जुगार मटका प्रतिबंध अधिनियमांनुसार
लातूर जिल्ह्यात 82 व्यक्ती विरोधात 32 गुन्हे दाखल करण्यात आले असून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 1,16,850/-रुपयाचा मध्यमान जप्त करण्यात आलेला आहे.
-देशी विदेशी दारू हातभट्टी याची वाहतूक व निर्मिती करणाऱ्या 122 जनाविरुद्ध तब्बल 100 गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास 3 लाख रुपयाची हातभट्टी दारूचे रसायन पोलिसांकडून नष्ट करण्यात आले आहे. तसेच 1,34,830/- रुपयाची देशी-विदेशी कंपनीची दारू जप्त करण्यात आलेली आहे.
-अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला.
- विविध गुन्ह्यात फरार असलेल्या 5 गुन्हेगारांना ताब्यात आले.
- न्यायालयाकडून काढण्यात आलेले आरोपी विरुद्धचे 98 अटक वॉरंट बजावण्यात आले आहेत.
दिनांक 14 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर च्या रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यत लातूर पोलिसाकडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कोंबिंग ऑपरेशन मध्ये पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी मार्गदर्शन करून जिल्ह्यातील 53 अधिकारी, 182 पोलीस अंमलदार व 121 होमगार्ड यांचे अनेक पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान फरार आरोपी अटक करणे, लॉज व हॉटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे,अभिलेखावरील गुंडाचा/गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता.
त्यानुसार लातूर पोलिसांनी -110 लॉजेस व हॉटेलची तपासणी करण्यात आली.
-न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणाऱ्या 19 आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आलेली आहे.
-जिल्ह्यात विविध 23 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून 827 संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली.
- 30 मर्मस्थळाची तपासणी करण्यात आली.
-पोलीस रेकॉर्ड वरील 53 सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले.
- मालमत्तेविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या 09 इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122(क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-अवैध दारु विक्री करणाऱ्यावर 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन मध्ये केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये जिल्ह्यातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहभागी झाले होते.
गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या, शांतता बाधित करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली असून यामध्ये
-फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 107 अन्वये 868 व्यक्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कलम 110 अन्वये 136 गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
-दखलपात्र गुन्हा/अपराध होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी फौजदार प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे तब्बल 1744 व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली आहे.
-वारंवार दारूबंदी अधिनियम कायद्याचा भंग करणारे,अनेक गुन्हे दाखल असलेल्या लातूर जिल्ह्यातील 266 सराईत अवैध दारू विक्रेत्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 93 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) 1985
अन्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
- मालमत्ते विषयक व शरीराविषयी गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध लातूर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 व 56 प्रमाणे हद्दपारीचे 53 प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
तसेच सण-उत्सव अतिशय उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी प्रत्येक गावात भेटी देऊन जनतेशी संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन त्याच्यावर उपाय योजना करण्यात आल्या. पोलीस ठाणे हद्दीत ग्रामभेटी चे आयोजन करून सदरच्या ग्राम भेटीमध्ये ठाणे प्रभारी अधिकारी व बीट अंमलदार यांनी अनेक गावात बैठका घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन आगामी सण उत्सव अतिशय उत्साही वातावरणात, निर्विघ्नपणे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
लातूर जिल्हा पोलीस कडून शक्तिप्रदर्शन करीत कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक गावात पोलीस दलातर्फे मोठ्या संख्येने दंगा काबू पथक,शीघ्र कृती दल, चार्ली पोलीस पेट्रोलिंग यांच्यासह पोलीस अधिकारी व अमलदारांचा समावेश असलेले रोडमार्च काढण्यात आले. सदरच्या प्रभावी रोडमार्च मुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून कोणत्याही परिस्थितीला सक्षमपणे हाताळण्याकरिता जिल्हा व तालुका स्तरावर मॉकड्रिल चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अश्रूधुर,मॉब डिस्पोझल चा सराव करण्यात आला आहे.
एकंदरीत गणेशउत्सव 2023 व ईद-ए-मिलाद शांततेत, निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सक्षम असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.